सावधान ! वैधता तपासूनच घ्या सिलिंडर

By Admin | Updated: February 23, 2015 01:17 IST2015-02-23T01:17:38+5:302015-02-23T01:17:38+5:30

ग्राहक जागृतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, असे असतानाही काही बाबी यातून सुटताना दिसतात. दैनंदिन वापरातील घरगुती सिलिंडरच्या बाबतीत...

Be careful! Check validity cylinders | सावधान ! वैधता तपासूनच घ्या सिलिंडर

सावधान ! वैधता तपासूनच घ्या सिलिंडर

चंद्रपूर : ग्राहक जागृतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, असे असतानाही काही बाबी यातून सुटताना दिसतात. दैनंदिन वापरातील घरगुती सिलिंडरच्या बाबतीत ग्राहकांत कमालीची अनभिज्ञता दिसून येते. प्रत्येक वस्तुची कालमर्यादा ठरलेली असून सिलिंडरलाही ती आहे. ही बाब कुणीच गंभीरतेने घेत नाही. आॅईल कंपन्यांपासून वितरकांपर्यंत सर्वांचेच याकडे दुर्लक्ष होत असून पुरवठा विभागाच्याही अखत्यारितील ही बाब नाही. यामुळे ग्राहकांनी जागरूकता बाळगणे गरजेचे झाले आहे.
दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक बाब झालेल्या सिलिंडरचा पुरवठा आणि वापराबाबतचे नियम ग्राहकांना माहितीच असेल याची शाश्वती नाही. या नियमांबाबत ग्राहकांना माहिती देण्याचे काम गॅस कंपन्यांचे आहे. मात्र याची अंमलबजावणी कितपत होते, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.
सिलिंडरला ‘एक्सपायरी डेट’ असते, हे अनेकांना माहितीच नाही. जिल्ह्यात गॅसधारकांची संख्या लाखोंवर आहे.
प्रत्येक उत्पादनाला जशी निर्मितीची तारीख असते तसेच ते उत्पादन किती दिवसांपर्यंत वापरण्यायोग्य आहे, याचाही अवधी ‘त्या’ उत्पादनावर नोंदविलेला असतो. घरगुती आणि व्यावसायिक वापरात असलेल्या गॅस सिलिंडरच्या बाबतीतही असेच आहे. गॅस सिलिंडरच्या बाबतीत सुरक्षेचे काही मापदंड आहेत. वितरक आणि गॅस एजन्सीच्या भाषेत सिलिंडरची ‘एक्सपायरी डेट’ यालाच ‘ड्यू फॉर फिलिकल टेस्टिंग’ असे म्हणतात. परंतु, सर्वसामान्यांच्या भाषेत याला ‘एक्सपायरी डेट’ असेच म्हणतात. नवीन सिलिंडर घरी किंवा व्यवसायासाठी आणल्यानंतर त्याची पुर्नतपासणी करून घेतल्यास भविष्यात होणारा अपघात टाळता येईल.
मात्र, शहरी व ग्रामीण भागात याविषयी अनभिज्ञता असून जागृतीची गरज आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एस. आळे यांच्याशी संपर्क साधला असता, संर्पक होऊ शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
अशी ओळखावी ‘एक्सपायरी डेट’
सिलिंडरवर असलेल्या ‘एक्सपायरी डेट’ची माहिती मिळावी याकरिता वर्षाची चार भागात विभागणी करण्यात आली आहे. महिन्याची ओळख होण्याकरिता ए, बी, सी, डी असे चार भाग केले जातात. एका भागात तीन महिन्यांचा समावेश आहे. जसे ए-१५ असल्यास २०१५ मध्ये जानेवारी ते मार्च महिन्याच्या काळात या सिलिंडरची कालर्मयादा संपणार, असे समजावे.
सिलिंडरच्या वरच्या भागावर असते एक्सपायरी डेट
बऱ्याच ग्राहकांना सिलिंडरचीही वयोर्मयादा असते, याची माहिती नाही. त्यामुळे सिलिंडरवर त्याची तारीख नेमकी कुठे असते, याची माहिती नसते. सिलिंडरच्या वरच्या भागाला असलेल्या तीन उभ्या पट्यांपैकी एका पट्टीवर सिलिंडरचे वजन लिहिलेले असते तर दुसऱ्या पट्टीवर त्याची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. त्यामुळे सिलिंडर घेताना प्रत्येक ग्राहकाने त्याची पाहणी करूनच सिलिंडर घेणे गरजेचे आहे. कालमर्यादा संपलेले सिलिंडर घरी ठेवणे अपघाताचे कारण ठरू शकते.

Web Title: Be careful! Check validity cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.