ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्यावर भर देणार- बावनकुळे
By Admin | Updated: October 14, 2015 01:18 IST2015-10-14T01:18:11+5:302015-10-14T01:18:11+5:30
ग्राहक हाच आपला केंद्रबिंदू असून ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्याचे कार्य महावितरण कंपनीचे आहे.

ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्यावर भर देणार- बावनकुळे
चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाचे उद्घाटन : एलईडी बल्ब लावण्याचे आवाहन
चंद्रपूर : ग्राहक हाच आपला केंद्रबिंदू असून ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्याचे कार्य महावितरण कंपनीचे आहे. ग्राहकांना सेवा देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचा-यांची असून ती सेवा वेळेत देण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने व गांभीर्याने आपली सेवा बजावावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सोमवारी केले.
चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचलार्वार, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार नानाभाऊ श्यामकुळे, आमदार डॉ. देवराव होळी, उपमहापौर वसंत देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, महावितरणचे कार्यकारी संचालक संजय ताकसांडे, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे , पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे आदी मंचावर उपस्थित होते.
ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भ- मराठवाड्यावर यापूर्वी कायम अन्याय झाला असून याठिकाणी प्राधान्याने ग्राहकांना, शेतकऱ्यांना मुबलक वीज, विजेच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे वीज आहे त्यांनी शासनाने सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेली एलइडी बल्ब वापरून वीज बचतीसाठीही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, परिमंडळाच्या कार्यालयाचा प्रस्ताव दिल्यानंतर केवळ १५ दिवसांमध्ये परिमंडळ कार्यालयाची मान्यता ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच या परिमंडळाच्या माध्यमातून १९८१ पासून विभक्त झालेल्या गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडण्याचे कामही त्यांनी केले, याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक केले. (प्रतिनिधी)