बॅरिस्टर खोब्रागडे म्हणजे कोळशातील हिरा !
By Admin | Updated: September 27, 2015 00:47 IST2015-09-27T00:47:09+5:302015-09-27T00:47:09+5:30
कोळशाच्या खाणीत हिरे सापडतात, असे आपण ऐकले होते, मात्र कधी बघितले नाही. पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे कर्तृत्व बघता हे वाक्य तंतोतंत लागू होते.

बॅरिस्टर खोब्रागडे म्हणजे कोळशातील हिरा !
सुधीर मुनगंटीवार : बॅरि. खोब्रागडेंच्या स्मृतिदिनी गौरवोद्गार
चंद्रपूर : कोळशाच्या खाणीत हिरे सापडतात, असे आपण ऐकले होते, मात्र कधी बघितले नाही. पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे कर्तृत्व बघता हे वाक्य तंतोतंत लागू होते. ते खऱ्या अर्थाने हिरा होते. चंद्रपूरचे नाव देशाच्या नकाशावर आणण्याचे काम बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कर्तृत्वामुळे शक्य झाले, असे गौरवोदगार राज्याचे वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
शुक्रवारी २५ सप्टेंबरला सायंकाळी स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचा ९० वा जयंती समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नाना शामकुळे, ज्येष्ठ पत्रकार रामदास रायपुरे, डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेश मून, महावितरणच्या कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार आदी प्रमुख पाहुणे होते.
यावेळी बोलतांना मुनगंटीवार म्हणाले, राजाभाऊंनी भूमिहिनांसाठी केलेली आंदोलने, दारूबंदीसाठी केलेला संघर्ष सर्वसामान्यांसाठी आदर्शवत ठरला आहे. या संघटन कुशल नेत्याने चंद्रपूरहून राजधानी दिल्लीत राज्यसभेचा उपसभापती म्हणून मारलेली धडक कर्मवीर मा.सा. कन्नमवारांनंतर जिल्ह्यात कोणालाही शक्य झाली नाही. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून त्यांनी समाजात समता, ममता, बंधुत्व निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. भाजपा सरकारने मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा देश घडविण्यासाठी आम्हाला मिळणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने हे वर्ष समता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन येथील डॉ. बाबासाहेबांच्या निवासस्थानी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन राज्यात सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार श्यामकुळे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)