२० हजार ७९ कृषिपंपधारकांचे वीजबिल कोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST2022-02-17T05:00:00+5:302022-02-17T05:00:25+5:30
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार झाली. वर्षानुवर्षे थकबाकीत असलेल्या थकबाकीतून कृषिपंपधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत म्हणजेच तीन वर्षांकरिता असलेल्या या योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरून संपूर्णपणे थकबाकीमुक्तीची संधी मिळाली आहे. महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांनी कृषिग्राहकांच्या बांधावर, घरी व ठिकठिकाणी मेळावे, सायकल रॅली काढून योजनेबाबत माहिती दिली.

२० हजार ७९ कृषिपंपधारकांचे वीजबिल कोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कृषिपंप वीजजोडणी व थकबाकी सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण-महाकृषी ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत चंद्रपूर परिमंडलात ४२ हजार ६८५ कृषिपंप ग्राहकांनी ऑक्टोबर २०२०पासून ३९ कोटी २५ लाखांचा भरणा करीत थकबाकीमुक्त झाले. २० हजार ७९ कृषिपंपधारकांनी २१ कोटी ३ लाखांचा भरणा करून वीजबिल कोरे करण्याचा लाभ घेतला आहे.
कृषिग्राहकांना वीजबिल थकबाकीवर सूट, विलंब आकार व व्याज अशी एकत्रित ७३ कोटी ४५ लाखांची माफी मिळाली आहे. सर्व थकबाकीमुक्त कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याचे प्रमाणपत्र महावितरणतर्फे देण्यात आले.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार झाली. वर्षानुवर्षे थकबाकीत असलेल्या थकबाकीतून कृषिपंपधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत म्हणजेच तीन वर्षांकरिता असलेल्या या योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरून संपूर्णपणे थकबाकीमुक्तीची संधी मिळाली आहे. महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांनी कृषिग्राहकांच्या बांधावर, घरी व ठिकठिकाणी मेळावे, सायकल रॅली काढून योजनेबाबत माहिती दिली. त्यामुळे प्रतिसाद मिळाल्याची माहिती मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.
निम्मी रक्कम भरावी लागणार
चंद्रपूर परिमंडलातील एकूण ७९ हजार ७१८ ग्राहकांना सप्टेंबर २०२० पर्यंतच्या २३३ कोटींच्या वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखांची सूट व सोबतच २१ कोटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हणजे एकत्रितपणे ४० कोटी माफ होऊन १९२ कोटी अशी सुधारित थकबाकी निर्धारित केली आहे. सुधारित थकबाकीपैकी ३१ मार्चपर्यंत निम्मी रक्कम ९६ कोटी कृषिग्राहकांना भरायची आहे. ९६ कोटींची वीजबिलमाफी, वीजबिल थकबाकीवर १८ कोटी ६७ लाखांची सूट व सोबतच २१ कोटी ३३ लाख विलंब आकार व व्याज म्हणजे एकत्रितपणे ४० कोटी असे एकत्रिपणे कधी नव्हे ती १३६ कोटींची माफी कृषिग्राहकांना मिळणार आहे.