चार वाजता बार बंद, रस्त्यावरच दे दारू सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:29+5:302021-07-22T04:18:29+5:30
जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अनेक मद्यपींना घरपोच दारू मिळत होती. मात्र, आता दारू सुरू झाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे अतिरिक्त ...

चार वाजता बार बंद, रस्त्यावरच दे दारू सुरू
जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अनेक मद्यपींना घरपोच दारू मिळत होती. मात्र, आता दारू सुरू झाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे अतिरिक्त पैसे मोजण्याची सध्यातरी गरज नाही. मात्र, दुपारी ४ वाजेपर्यंत दारू दुकाने सुरू रहात असल्याने आपला शौक पूर्ण करण्यासाठी मद्यपी ४ वाजण्यापूर्वीच दारू विकत घेऊन ती सुरक्षित ठेवत आहेत. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत तसेच निर्जनस्थळी जात आपला शौक पूर्ण करीत आहेत. याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
बाॅ्स
रस्त्यावरच भरते मधुशाळा
नागपूर रोड
चंद्रपूर-नागपूर रोडवरील वडगाव चौकापासून तर पुढे पडोली चौकापर्यंत रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी दारू शौकीन आपली मौज पूर्ण करताना दिसून येत आहेत. विशेषत: सुटीच्या दिवशी ही संख्या अधिक प्रमाणात असते.
बाॅकस्
तुकूम रोड
दारू सुरू झाल्यानंतर तुकूम, दूर्गापूर मार्गावर मद्यपी वाट्टेल तिथे दारू पित असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: पोलीस ठाणे तसेच मुख्यालयही काही अंतरावरच आहे. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. विशेषत: महेश नगर परिसरात होमगार्ड कार्यालय परिसरात असलेल्या मोकळ्या जागेमध्येही अनेक जण आपला मद्यपानाचा शौक पूर्ण करीत आहेत.
बाॅक्स
पठाणपुरा गेट बाहेर
दारू सुरू झाल्यानंतर पठाणपुरा गेट बाहेरील परिसरात दुपारी ४ वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात मद्यपींची गर्दी बघायला मिळत आहे. काही जण परिसरात असलेल्या दारू दुकानातून दारू विकत घेत असून रात्री उशिरापर्यंत गेट बाहेरील मोकळ्या जागेत बसून आपला शौक पूर्ण करीत आहेत.
बाॅक्स
नागरिकांना त्रास
जिल्ह्यात दारू सुरू झाल्यानंतर दारू दुकान तसेच बार परिसरामध्ये असलेल्या शेजाऱ्यांना त्रास होत आहे. विशेषत: अनेक बारला वाहनतळच नसल्यामुळे वाट्टेल तिथे आपली वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होत आहे. विशेषत: दुपारी ४ वाजल्यानंतर दारू दुकाने बंद झाल्यानंतर मोकळ्या जागा असलेल्या परिसरात मद्यपी दारू पित असल्यामुळे शेजाऱ्यांना तसेच रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही मोठा त्रास होत आहे.