बँक कर्मचारीच करतात खातेदारांशी अरेरावी
By Admin | Updated: April 12, 2015 00:46 IST2015-04-12T00:46:47+5:302015-04-12T00:46:47+5:30
येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी खातेदरांशी असभ्यपणे वागतात.

बँक कर्मचारीच करतात खातेदारांशी अरेरावी
अध्यक्ष व संचालकांकडे तक्रार : महिला कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणी
भद्रावती: येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी खातेदरांशी असभ्यपणे वागतात. एवढेच नाही तर वयोवृद्ध खातेदरांशीही अरेरावी करतात, अशी तक्रार अध्यक्ष आणि संचालक मंडळाकडे काही खातेदारांनी केली आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या येथील शाखेत महिला कर्मचाऱ्यांचा अधिक भरणा आहे. त्यांच्याकडून खातेदारांना उत्तम सेवा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र येथील चित्र उलट आहे. येथील महिला कर्मचारी व अधिकारी सौजन्याने तर सोडाच, साधी माहिती विचारली असता वयोवृद्धांसोबतही हमरीतुमरीची भाषा वापरतात.
या बँकेशी ग्रामीण भागातील शेतकरी व कामगार ग्राहक मोठ्या संख्येने जुळले आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी, महिला बचत गट, विजेचीे देयके आदी व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे या बँकेत नेहमीच ग्राहकांची गर्दी असते.
मात्र बँकेत कार्यरत महिला कर्मचारी खातेदारांंशी मग्रुरीची भाषा वापरतात अशी तक्रार आहे. या साऱ्या प्रकाराने येथे दररोज गोंधळाचे वातावरण असते. बँकेतील देवाण घेवाणीच्या व्यवहारासाठी खातेदारांना तासन् तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यातच कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तनाचा मन:स्ताप सहन करावा लागतोे. कर्मचाऱ्यांनी चांगली वागणूक द्यावी, यासाठी त्रस्त खातेदारांनी बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)
वीज देयक भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा
वीज वितरण कंपनीच्या विद्युत बिलाच्या देयकांचा भरणा एकाच कॅश काऊंटरवरुन होत असल्याने त्या काऊंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे वीज देयक भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा, अशी मागणी आहे. तसे झाल्यास इतर नियमित ग्राहकांना आपले व्यवहार करण्यासाठी त्रास होणार नाही. या गर्दीचा फायदा घेवून काही असामाजिक तत्व मंडळी आपला उद्देश साध्य करण्यासाठी या बँकेतील ग्राहकांना केव्हा शिकार बनवतील, याचा नेम नाही.