बांद्रा जि.प. शाळा भाड्याच्या खोलीत
By Admin | Updated: February 8, 2015 23:32 IST2015-02-08T23:32:02+5:302015-02-08T23:32:02+5:30
कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातंर्गत शासनाच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्याचा कांगावा होत असताना वरोरा तालुक्यातील

बांद्रा जि.प. शाळा भाड्याच्या खोलीत
वरोरा : कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातंर्गत शासनाच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्याचा कांगावा होत असताना वरोरा तालुक्यातील बांद्रा जि. प. शाळा भाड्याच्या खोलीत सुरु आहे. शाळेला इमारत आहे, मात्र दोनच वर्ग खोल्या असून त्याही जीर्ण आहेत. त्यामुळे शाळेतील तीन वर्ग मागील काही दिवसांपासून भाड्याच्या घरात भरविले जात आहे.
वरोरा तालुक्यातील जि.प. बांद्रा शाळेत इयत्ता १ ते ५ वी पर्यंतचे वर्ग असून ६४ मुले मुली शिक्षण घेत आहेत. कवेलू व स्लॅब असलेल्या दोन इमारती शाळेला होत्या. कवेलूची इमारत जीर्ण झाल्याने पाडण्यात आली आहे तर बावीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या स्लॅबच्या इमारतीत एक हॉल व एक वऱ्हांडा आहे. यामध्ये इयत्ता १ ते ५ मधील ६४ विद्यार्थ्यांना तीन शिक्षक शिकवीत आहे. सध्या जी इमारत आहे, त्याच्या स्लॅबला भगदाडे पडले असून इमारत जीर्ण अवस्थेत आहे.
याच इमारतीत विद्यार्थी विद्यार्जनाचे कार्य व शाळेचे कार्यालय थाटण्यात आले आहे. या इमारती मधील हॉलमध्ये शाळेचा रेकार्ड व साहित्य अर्ध्या जागेत प्लॅस्टीकमध्ये गुंडाळून ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्याकरिता बसण्याकरिता जागा नाही. परिणामी इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता शाळेसमोरील एका व्यक्तीच्या भाड्याच्या खोलीत डेस्क बेंच लावून व्यवस्था करण्यात आली आहे.
खाजगी व्यक्तीच्या घरात मागील काही दिवसापासून जि.प. शाळेचे वर्ग चालवीले जात असून सदर घराचा भाड्याच्या प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. परंतु, हा प्रस्ताव अद्यापही मंजूर झाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे किराया सदर व्यक्तीस मिळाला नाही तर येत्या काही दिवसांत किरायाच्या घरातही शाळा चालविणे बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)