उखडलेल्या रस्त्यांवर सहा कोटींची ‘मलमपट्टी’
By Admin | Updated: October 30, 2014 22:49 IST2014-10-30T22:49:12+5:302014-10-30T22:49:12+5:30
औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. यामुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपला

उखडलेल्या रस्त्यांवर सहा कोटींची ‘मलमपट्टी’
लखमापूर: औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. यामुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी तब्बल सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र रस्त्यांची अवस्था आजही गंभीर आहे. त्यामुळे मलमपट्टीवर खर्च करण्यात आलेला पैसा गेला तरी कुठे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.
कोरपना तालुक्यात सन २०१०-११ पासून तर, आजतागायत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. गडचांदूर, सोनुर्ली, वनसडी या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी १ कोटी १९ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला. त्यानंतर रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करून कामपूर्ण झाल्याचा देखावा करण्यात आला. अल्पावधीतच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले. आता हेच खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत.
कन्हाळगाव, पारडी, चनई, मांडवा, वनसडी, पकडीगुड्डम, पिपर्डा, कुसळ, धानोली, येरगव्हाण, वनोजा, नारंडा, भोयेगाव आदी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्र्रमाणात खर्च करण्यात आला. यातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती झाली नसतानाही कागदोपत्री रस्त्यांची दुरुस्ती दाखवून बिल उचलण्यात आल्याचे समजते.
कोरपना, कोडशी, हेटी, कोरपना, तांबडी, कोडशी मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची परवानगी न घेता अवैधरित्या उत्खनन करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. यातही अर्धवट काम केल्याने याही रस्त्यावरून जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही वर्षामध्ये बांधकाम विभागाला रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती आणि रस्त्याच्या कडेला असलेले झुडपे तोडण्यासाठी जवळपास सहा कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला. या निधीतून रस्ते चकचकीत नाही पण किमान खड्डे बुजविणे अपेक्षित होते. मात्र रस्त्यावरील खड्डे काही कमी झाले नाही. गडचांदूर, वनसडी, कोरपना हा मुख्य मार्ग समोर आंध्रप्रदेशातील आदिलाबादकडे जातो. या मार्गावर अनेकवेळा अपघात झाले आहे. वाहनांची सारखी वर्दळ असते. यातच वनसडी, सोनुर्लीजवळ रस्त्याचे कठडे उघडे पडले आहे.त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. गडचांदूर-नांदाफाटा मुख्य मार्गावरही रस्त्यावर खड्डे पडले आहे. काही दिवसापूर्वी बांधकाम विभागाने मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्र्रयत्न केला. मात्र दोन-चार दिवसात पुन्हा खड्डे उघडे पडले आहे. या रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे आबिद अली यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)