पावसाळी पर्यटनावरील बंदीमुळे स्थानिकांचा रोजगार बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:05+5:302021-07-23T04:18:05+5:30
सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचा फटका : शासकीय मदतही नाही राजकुमार चुनारकर चिमूर : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर ...

पावसाळी पर्यटनावरील बंदीमुळे स्थानिकांचा रोजगार बुडाला
सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचा फटका : शासकीय मदतही नाही
राजकुमार चुनारकर
चिमूर : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची झुंबड उडते. चिमूर, नागभीड, कोरपना, सावली या तालुक्यांत पर्यटकांना धबधबे आकर्षित करतात. येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळतो. मात्र, मागील वर्षापासून कोरोना निर्बंधामुळे आणि पावसाळी पर्यटनावरील बंदीमुळे स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे ठप्प झालेला रोजगार यंदा तरी पुन्हा मिळेल, या आशेवर असलेले स्थानिक विक्रेते आणि व्यावसायिक यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.
लॉकडाऊनमुळे आधीच तोट्यात गेलेला व्यवसाय आता कुठे रुळावर येत असतानाच जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. यामुळे पर्यटनस्थळांच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्या आदिवासी, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या रोजगारावर पुन्हा संकट कोसळले आहे. बंदीमुळे पर्यटक आले नाही तर रानमेवा, रानभाज्या विकायच्या कुठे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. छोटेखानी छपरात खाद्यपदार्थांच्या किरकोळ विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे त्यांच्यातही अस्वस्थता पसरली आहे.
बॉक्स
या तालुक्यात आहेत पर्यटनस्थळे
निसर्गसंपन्न असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, नागभीड, सावली, कोरपना या तालुक्यांमध्ये पर्यटकांना आकर्षित करणारी पर्यटनस्थळे आहेत. यात धरणाचे पाणलोट क्षेत्र, नद्यांचे काठ, धबधबे, माळरान अशा ठिकाणांचा समावेश आहे. निसर्गाच्या कुशीत असणारी ही स्थळे शहरांपासून बरीच दूर आहेत. पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ वाढल्यानंतर येथील स्थानिक रहिवासी फळे, भाज्या, मासे विक्रीची दुकाने थाटतात.
पर्यटकांना याच स्थानिकांच्या मदतीने अस्सल घरगुती जेवण आणि इतर खाद्यपदार्थांची चव चाखता येते. स्थानिकांनाही यातून चांगला रोजगार मिळतो.