लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : मागील अडीच वर्षांपासून बल्लारशाह ते मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे बेहाल होते. त्यांना नागपूरला जाऊन गाडी पकडावी लागत होती. ती समस्या आता दूर झाली असून, रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे बल्लारशाह ते मुंबई ही रेल्वे गाडी ८ एप्रिलपासून बल्लारशाह रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे; परंतु ही गाडी थेट मुंबईला जाणार नसून व्हाया आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाणार असल्यामुळे प्रवाशांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.बल्लारशाह मुंबई रेल्वे गाडीसंदर्भात येथील नेते मंडळी नवनवे अंदाज बांधत होते व वेळोवेळी घोषणा करीत होते. त्यांच्या घोषणा फोल ठरल्या आहेत. ८ एप्रिलला सुरू होणारी बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेस व्हाया औरंगाबाद जाणार असल्याने रेल्वे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. मागील ३० वर्षांपासून थेट बल्लारशाह-मुंबई रेल्वे गाडीची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. मुंबईसाठी ही रेल्वे गाडी आठवड्यातून दोन दिवसच धावणार आहे. ही गाडी मुंबईहून रविवार व मंगळवारी रात्री ९.४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी बल्लारशाह स्थानकावर ७.५० ला पोहोचेल व इथेच थांबेल आणि बल्लारशाह स्थानकावरून परत मुंबईसाठी सोमवार व बुधवारी रात्री ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचेल.
गाडी थेट नसल्याने प्रवाशांमध्ये गैरसोयही थेट वर्धामार्गे न जाता ही रेल्वेगाडी आदिलाबाद, नांदेड, औरंगाबादमार्गे जाणार असल्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांना सोयीचे झाले आहे; परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची गैरसोय झाली आहे.
बल्लारशाह मुंबई गाडीसंदर्भात रेल्वे बोर्डाच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी मुंबईला थेट गाडीची मागणी केली होती. याशिवाय मागील तीन वर्षांपासून बल्लारशाह येथे सुरू पीटलाइनचे काम अजून पूर्ण झाले नाही. ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठेकेदाराला बजावले आहे. त्यानंतर थेट गाडी सुरू करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे; परंतु त्याआधी रेल्वे प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो, याचाही अंदाज रेल्वे प्रशासन घेणार आहे. - जयकरणसिंह बजगोती, डीआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे, बल्लारशाह