बल्लारपूर रोजगार निर्मितीचे केंद्र होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:42 IST2018-12-30T23:42:38+5:302018-12-30T23:42:57+5:30
बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, क्रीडा संकूल, डायमंड प्रशिक्षण केंद्र, एक हजार महिलांसाठी सिलाई मशीन केंद्र अशा अनेक पायाभूत सुविधा शहरात निर्माण होत आहे. या माध्यमातून बल्लारपुरातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. बल्लारपूर हे भारतातील एक सर्वात सुंदर शहर म्हणून पुढे येतच आहे.

बल्लारपूर रोजगार निर्मितीचे केंद्र होईल
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, क्रीडा संकूल, डायमंड प्रशिक्षण केंद्र, एक हजार महिलांसाठी सिलाई मशीन केंद्र अशा अनेक पायाभूत सुविधा शहरात निर्माण होत आहे. या माध्यमातून बल्लारपुरातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. बल्लारपूर हे भारतातील एक सर्वात सुंदर शहर म्हणून पुढे येतच आहे. नजीकच्या काळात ते रोजगार निर्मितीचे मुख्य केंद्रदेखील होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे केले.
बल्लारपूर शहरातील शिवाजी वार्ड, गौरक्षण वार्ड, रविंद्र नगर वार्ड, मौलाना आझाद वार्ड आदी ठिकाणच्या सात कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील विविध तीन भागांमध्ये घेतलेल्या सभांमध्ये बोलताना त्यांनी बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या शहराने भरभरून आपल्याला दिले असल्यामुळे या शहराला रोजगार, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते व आवश्यक पायाभूत सुविधांनी भारतातील एक सुंदर शहर बनविण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बल्लारपूर मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील बदल आता लक्षात येण्याइतपत जाणवतो. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील एका सर्वांगसुंदर मतदारसंघाचे वैभव या बल्लारपूर मतदारसंघाला प्राप्त होईल. येथील सैनिकी शाळा देशाला भूषण ठरणारी बनत आहे. बॉटनिकल गार्डनची जोमाने तयारी सुरू आहे. मुलींची पहिली डिजिटल शाळा नगरपालिकेमार्फत या ठिकाणी निर्माण होत आहे. शहरात उत्तम बाजारपेठही आकाराला येणार आहे. याठिकाणी अद्ययावत पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालय लक्षवेधी ठरले आहे. बल्लारपूर शहरांमध्ये एकूण ९० कोटी रुपये खर्च करून २४ तास चालणाºया पाणीपुरवठा योजनेला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र रस्ते निर्मिती आणि पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सांगड घालण्यासाठी या योजनेला थोडा विलंब होत आहे. बल्लारपूरच्या प्रत्येक वार्डामध्ये नागरिकांना मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध पाणी देणारे पाण्याचे एटीएम उघडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बल्लारपूर शहरातील तीन हजार बेघरांना अद्यावत घरे देण्याचे आपले स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, बल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, सभापती रेणुका दुधे, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विपिन मुग्धा उपस्थित होते.