बल्लारपूर क्रीडा संकुल ऑलम्पिक तयारीसाठी रिलायन्सने दत्तक घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:37+5:302021-01-14T04:23:37+5:30
सुनील केदार : सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनुसार मुंबईत बैठक चंद्रपूर : २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी प्राविण्यप्राप्त खेळाडू तयार ...

बल्लारपूर क्रीडा संकुल ऑलम्पिक तयारीसाठी रिलायन्सने दत्तक घ्यावे
सुनील केदार : सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनुसार मुंबईत बैठक
चंद्रपूर : २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी प्राविण्यप्राप्त खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांकरवी प्रशिक्षण व अन्य बाबींसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल रिलायन्स फाऊंडेशनने दत्तक घ्यावे, यासाठी राज्य सरकार रिलायन्स फाऊंडेशनला विनंती करेल. तसेच बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र म्हणून मान्यता मिळावी, यासाठी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांनासुध्दा आपण विनंती करणार असल्याचे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिले.
मिशन शक्ती अंतर्गत बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे २०२४ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करण्यासाठी रिलायन्स स्पोर्ट फाऊंडेशनसोबत करार करण्याच्या विषयासंदर्भात माजी अर्थमंत्रीआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालयात ना. केदार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर, गडचिरोली या आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित जिल्ह्यातील खेळाडू २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी प्राविण्यप्राप्त ठरावे यादृष्टीने मिशन शक्ती या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक क्रीडा विषयक सुविधांनी परिपूर्ण असे बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल बांधण्यात आले. या तालुका क्रीडा संकुलाची देखभाल व दुरुस्ती तसेच खेळाडू प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध व्हावे, यासाठी रिलायन्स स्पोर्ट फाऊंडेशनने दत्तक घ्यावे, अशी विनंती रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा निता अंबानी यांच्याकडे आपण केली असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.
या तालुका क्रीडा संकुलाच्या वसतिगृहाची संरक्षक भिंत, सोलार सिस्टीम यासाठी त्वरित अंदाजपत्रक सादर करावे, आपण यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देऊ, असे ना. केदार यांनी यावेळी सांगितले.