बल्लारपूर पेपर मिलशी श्रीगणेशाचे असे सख्य !
By Admin | Updated: September 11, 2016 00:45 IST2016-09-11T00:45:41+5:302016-09-11T00:45:41+5:30
संकट मोचन अशी श्री गणेशाची कीर्ती आहे आणि गणेशाचे बल्लारपूर पेपर मिल सोबत चांगले जुने सख्य आहे.

बल्लारपूर पेपर मिलशी श्रीगणेशाचे असे सख्य !
संकट दूर होण्याची आशा : कामगारांच्या कुटुंबीयांची बाप्पाला प्रार्थना
बल्लारपूर : संकट मोचन अशी श्री गणेशाची कीर्ती आहे आणि गणेशाचे बल्लारपूर पेपर मिल सोबत चांगले जुने सख्य आहे. त्यामुळे या घडीला पेपर मिलवर भिरभिणारे संकट गणपती बाप्पाने दूर करावे, पेपर मिल पूर्ववत सुरू होवून परत त्याला पूर्वीसारखे भरभराटीचे दिवस येवो, अशी प्रार्थना या गणेशोत्सवात गणेश भक्त कामगार व त्यांचे आश्रित त्यांचे कुटुंबियांनी करणे अगदी स्वाभाविक आहे. आणि तशी प्रार्थना केली जात आहे.
बल्लारपूर पेपर मिलशी श्री गणेशाचे हे मिल सुरू झाले, तेव्हापासूनचे सख्य आहे, जवळीक आहे. या मिलमध्ये बनलेल्या पहिल्या कागदावर श्री गरेशाचे चित्र असलेले वॉटर मार्क उमटले होते. या वॉटर मार्कचा कागद बरेच दिवसपर्यंत निघत राहिला. बाजारात मोठ्या प्रमाणात खपू लागला होता.
श्री गणेशाचे हेच चित्र या मिलच्या पहिल्या एक नंबर मशीनच्या इमारतीच्या दर्शनी भागावरील भिंतीवर मूर्तीरूपाने स्थापित करण्यात आले. ही मूर्ती नागपूरच्या मूर्तीकाराने घडविली आहे. मिल प्रारंभ झाला, त्याच्या पहिल्या गणेशोत्सव ते आजपर्यंत प्रत्येक गणेश चतुर्थीला या मूर्तीला नव्याने रंगवून त्याची महाव्यवस्थापकाचे हस्ते पूजा केली जाते. विद्युत रोषणाईने हा भाग उजळविला जातो. यावर्षीही संकट असले तरी गणेश मदतीला धावणार, अशी आशा आहे.
पेपर मिल कॉलनीत व्यवस्थापनाकडून कलामंदिर जवळ गणेशोत्सवात मुर्ती बसविली जाते. हा क्रम गेले ६० वर्षांपासून सुरू आहे. त्याचप्रमाणे पेपर मिलच्या थापर गेट समोरील मेरी पार्क येथे गणेश मंदिर बनवून त्यात श्री गणेशाची संगमेवरवरची भव्य मूर्ती बसविली आहे. तद्वतच, जंगलात मिळालेल्या गणेशाच्या दोन सारख्या आकाराच्या दगडी मूर्तीही याच परिसरात छोटे मंदिर बनवून त्यात बसविल्या आहेत.
श्री गणेशाचे पेपर मिलमध्ये असे अनन्य साधारण महत्त्व आहे. आणि म्हणूनच पेपर मिलवर सध्या आले असलेले संकट दूर होईलच. शिवाय पूर्वीसारखी संपन्नता नांदेल, असा आशावाद विश्वास कामगारांच्या अधिकाऱ्यांच्या मनी आहे. (तालुका प्रतिनिधी)