बल्लारपूर नगरपरिषदेचा गौरव

By Admin | Updated: September 7, 2016 00:52 IST2016-09-07T00:52:12+5:302016-09-07T00:52:12+5:30

स्वच्छ भारत अभियानात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला आहे.

Ballarpur Municipal Council Gaurav | बल्लारपूर नगरपरिषदेचा गौरव

बल्लारपूर नगरपरिषदेचा गौरव

स्वच्छ भारत अभियान : अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पुरस्कार
बल्लारपूर : स्वच्छ भारत अभियानात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित झाला आहे. या पाठोपाठ बल्लारपूर नगरपालिकेने हागणदारीमुक्त अभियान व घनकचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करून स्वच्छ शहर, सुंदर शहर संकल्पना नागरिकांत रुजविली. त्याबद्दल राज्य शासनाच्या नगरविकास विभाग व एनडीटीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने नगराध्यक्ष छाया मडावी व मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांना चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी नगराध्यक्ष मडावी व मुख्याधिकारी मुद्धा, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, न.प. गटनेते देवेंद्र आर्य यांना पुरस्कारादाखल स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि १ कोटी ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला.
बल्लारपूर न.प.ला ‘ब’ वर्ग मिळालेला असून औद्योगिक शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत न.प. प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून स्वच्छ शहर, सुंदर शहर साकारण्यासाठी वॉर्डावॉर्डात गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्त शहर करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. जागृतीमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांमध्ये संकोच भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे. शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य ठिकाणी करण्यात आल्याने परिसर स्वच्छ झाला आहे.
स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह उपाध्यक्ष संपत कोरडे, स्वच्छता सभापती विनोद उर्फ सिक्की यादव, विरोधी पक्ष गटनेते चंदनसिंह चंदेल, यांच्या सहकार्याने स्वच्छा भारत अभियान राबविले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Ballarpur Municipal Council Gaurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.