भद्रावतीत निघाला बैलबंडी मोर्चा
By Admin | Updated: December 6, 2014 01:17 IST2014-12-06T01:17:37+5:302014-12-06T01:17:37+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी भद्रनाग स्वामी मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत बैलबंडी-उभारी मोर्चा काढण्यात आला.

भद्रावतीत निघाला बैलबंडी मोर्चा
भद्रावती : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी भद्रनाग स्वामी मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत बैलबंडी-उभारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. मोर्चा दरम्यान काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.
कापसाला ७ हजार ५०० रुपये, सोयाबिनला ५ हजार व धानाला ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २० हजार अनुदान देण्यात यावे, पिक कर्जाची मर्यादा ३० हजार प्रति एकर प्रमाणे देण्यात यावी, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करावी, रेतीघाटांचे लीलाव त्वरित करावे, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसील कार्यालयात मोर्चा आल्यानंतर नायब तहसीलदार किन्हेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन किन्हेकर यांनी दिले. या मोर्चात शेकडो शेतकरी बैलबंडीसह उपस्थित होते.
भाजपा- शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना केवळ स्वप्ने दाखविली. ‘अच्छे दिन आयेगें’ च्या भुलथापा दिल्या. सरकार सत्तेत आल्यानंतर सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे विसरल्याचे माजी आमदास जनार्दन साळुंखे म्हणाले.
शेतकऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला आहे. संविधाणाप्रमाणे चालणारे सरकार नाही. यांच्या विरोधात पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष व विधानसभा माजी उपाध्यक्ष अॅड.मोरेश्वर टेमुर्डे म्हणाले. सरकारने अद्यापही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. केवळ आश्वासन देत सरकार वेळ मारून नेत असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रशांत काळे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी भाजपा सरकारवर कडाडून टिका करीत केवळ आश्वासन देणारे सरकार असल्याचे म्हटले.
मोर्चात अॅड. मोरेश्वर टेमुर्डे माजी आमदार जनार्दन साळुंखे, सुधाकर रोहणकर, सुनील महाने, किशोर पडवे, मुनाज शेख, शरद जिवतोडे, सुनील तेलंग, नयन जांभुळे, भोलाजी टोंगे, ईश्वर घांडे, माणूसमारे, पुंजाराम वाग्दरकर तसेच शेकडो शेतकरी बैलबंसडीसह सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)