राजुरा तालुक्यात बैलजोडी चोरांचा धुमाकूळ
By Admin | Updated: February 2, 2016 01:15 IST2016-02-02T01:15:42+5:302016-02-02T01:15:42+5:30
शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा, शासनाचा बेजबाबदारपणा, सोबतच वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो.

राजुरा तालुक्यात बैलजोडी चोरांचा धुमाकूळ
शेतकऱ्यांपुढे नवे संकट : महिनाभरात चार बैलजोड्या पळविल्या
सास्ती: शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा, शासनाचा बेजबाबदारपणा, सोबतच वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यातच एक नवे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. ते म्हणजे त्यांच्या सर्जा-राजाच्या चोरीचे. राजुरा तालुक्यातील भुरकुंडा- भेंदोडा परिसरातील शेतकऱ्यांच्या चांगल्या बैलजोड्या पळविण्याचा सपाटा मागील महिनाभरापासून अज्ञात चोरट्यांनी सुरु केला आहे. परिसरातील चार बैलजोड्या चोरट्यांनी पळविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकऱ्यांना विविध संकटाचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्याला शेत माल उत्पादनात यश येत नाही. आणि आलेच तर शासनाच्या बेजबाबदारपणामुळे त्याला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागते. या सर्व संकटासोबतच राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे एक मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यांच्या जीवाभावाच्या सर्जाराज्याची बैलजोडी चोरट्यांनी पळवून लावण्याचा धुमाकूळ सुरु केला आहे. त्यामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एका नव्या संकटात सापडून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
राजुरा तालुक्यातील भूरकुंडा (बु.) येथील वसंता अनमनवार यांची घरासमोरील गोठ्यात बांधलेली बैलजोडी ३१ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी पळविली. येथील तुकाराम भिकाजी कोटरंगे यांची बैलजोडी १४ जानेवारीला आणि भेंदोडा येथील शेतकरी संतोष पोच्चू गादंगीवार यांचीही घरासमोर बांधलेली बैलजोडी २८ जानेवारीला रात्रीच्या वेळी चोरट्यांनी पळविली. परिसरातील सुकडपल्ली येथील एका शेतकऱ्यांचीसुद्धा बैलजोडी चोरी गेल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांच्या लाखो रुपये किमतीांच्या बैलजोड्या घरासमोरुन चोरीला जात असल्याने शेतकरी चांगलेच दहशतीत सापडले आहेत.
या प्रकरणात पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकरी स्वत:च आपल्या बैलजोडीच्या शोधात फिरत आहेत. परिसरात शोधाशोध करूनही त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याने व याबाबत कुठलीही मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे पोलिसांचा कानडोळा
बैलजोडी चोरी गेल्याची तक्रार करण्याकरिता पोलिसात गेलेल्या शेतकऱ्यांना मात्र योग्य न्याय मिळू शकला नाही. तक्रार देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना उलट सुलट प्रश्न विचारुन बैलजोडीचा फोटो आहे का? कुठेतरी गेली असेल बैलजोडी, परत येईलच. असे असमाधानकारक उत्तरे दिली जात आहे.यामुळे शेतकरी हताश होऊन परत जातात. पोलीस काही आपली बैलजोडी शोधून देऊ शकत नाही, ती आपल्यालाच शोधावी लागेल. आपल्याला कुणाचीही मदत मिळत नाही, अशा भावनेने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी आपणच शोधू असा पवित्रा घेऊन बैलजोडीच्या शोधात महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेशातही शेतकरी गेले असून शोधाशोध सुरू आहे.
परिसरातील बैलजोड्या चोरी गेल्या आहेत. ३१ डिसेंबर, १४ जानेवारी व २८ जानेवारी या तारखेला त्या चोरी गेलेल्या आहेत आणि त्या फक्त गुरुवार या दिवशीच चोरीला जात असल्याचे दिसून येत असल्याने जनावरांची चोरी नेमकी विक्री करण्यासाठी होत आहे की त्याची कत्तल करण्याच्या हेतूने होत आहे, हे एक कोडेच आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून याची प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
- सुधाकर गादंगीवार,
शेतकरी भेदोडा