चिमुरातील बालाजी सागर सौंदर्यीकरणास मंजुरी
By Admin | Updated: April 1, 2015 01:22 IST2015-04-01T01:22:29+5:302015-04-01T01:22:29+5:30
तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाअंतर्गत राज्यशासनाने चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान समोरील बालाजी सागर सौंदर्यीकरणाला मंजुरी दिली आहे.

चिमुरातील बालाजी सागर सौंदर्यीकरणास मंजुरी
चिमूर : तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासाअंतर्गत राज्यशासनाने चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान समोरील बालाजी सागर सौंदर्यीकरणाला मंजुरी दिली आहे. चार कोटी आठ लाखांच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून चालू वर्षाची तरतुद म्हणून ४० लाख रुपये निधी वितरीत करण्यात आल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
तसेच गोंदोडा येथे विकासासाठी चार कोटी ४१ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून त्यातही ४० लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. ३१० वर्षे जुने असलेल्या श्रीहरी बालाजी महाराजांची घोडायात्रा प्रसिद्ध असून पवित्र अशा चिमूर क्रांतीभूमीत देवस्थानच्या मालकीचे दोनशे एकरात भव्य तलाव आहे. शहराला लागून असल्याने या तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटनाला व तिर्थक्षेत्राला चालना मिळावी अशी नागरिकांची अपेक्षा होती.
चिमूरच्या श्रीहरी बालाजी देवस्थान सौंदर्यीकरण अंतर्गत बोटींग, आयर्लंड बेट व मार्ग साठी १४५ लाख, रबल पिचींगसाठी ३० लाख, संरक्षण भिंतीसाठी ५८ लाख, प्रवेशद्वार तीन लाख, शिल्ट प्रोटेक्शन १४ लाख, रंगमंच व सौंदर्यीकरण १३ लाख ८० हजार, मुलांचा बगीचा ५२ लाख, विद्युतीकरण सुविधा, पाणी सुविधा व सौंदर्यीकरण ८१ लाख असे एकूण चार कोटी आठ लाख २२ हजार रूपयाच्या प्रस्तावस शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेल्या गोंदोडा विकास आराखड्यासाठी चार कोटी ४१ लाख ५४ हजाराच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून यात सभागृह बांधकाम ३२१ लाख, मेडीटेशन हॉल ६३ लाख ७० हजार, सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी २९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)