वायगाव (तुकूम) येथील तलावाशेजारी वाघाचे बस्तान
By Admin | Updated: November 4, 2014 22:37 IST2014-11-04T22:37:38+5:302014-11-04T22:37:38+5:30
चंदनखेडा परिसरात इरई नदीकाठावरील वायगाव (तु.), कोकेवाडा (मान), विलोडा, टेकाडी या गावातील नागरिकांना शेतशिवारात वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वायगाव (तुकूम) येथील तलावाशेजारी वाघाचे बस्तान
चंदनखेडा : चंदनखेडा परिसरात इरई नदीकाठावरील वायगाव (तु.), कोकेवाडा (मान), विलोडा, टेकाडी या गावातील नागरिकांना शेतशिवारात वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच वायगाव (तु.) येथील तलावाशेजारी गावालगत गोऱ्ह्याची शिकार केल्यामुळे नागरिक दहशतीत आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पालालगत गावे असल्यामुळे इरई नदीकाठावरील गवतामध्ये अनेकदा शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन होत आहे. १५ दिवसांपूर्वी नदी ओलांडून वायगाव येथील तलावालगत मोहानीच्या झुडपी जंगलात एका मादी वााघाने आपले बस्तान मांडल्याचे प्रत्यक्षदर्शीने बघीतले आहे. अशात दोन दिवसांपूर्वी जितेंद्र भोजराज कुरेकार यांचा ३० हजार रुपये किंमतीचा गोऱ्हा तलावाशेजारी वाघाने मारल्याची घटना घडली. शेतकऱ्यांनी शेतावर जागलीला जाणेसुद्धा बंद केले आहे. त्यामुळे कसेबसे हाती येणारे धानाचे पीक रानडुकरे उद्ध्वस्त करीत आहे. या वाघाच्या दहशतीमुळे दिवसासुद्धा जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत आहे. याची दखल घेऊन वनविभागाने कॅमेरे लावून वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. वाघाला त्वरित पिंजऱ्यात बंद करुन बंदोबस्त करावा, अशी गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे. (वार्ताहर)