रस्ते व नाल्यांचा बॅकलाग
By Admin | Updated: January 29, 2015 23:04 IST2015-01-29T23:04:48+5:302015-01-29T23:04:48+5:30
चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात येऊन आता जवळजवळ तीन वर्षांचा कालावधी होत आहे. महानगरपालिकेच्या तिजोरीत निधीची कमतरता आहे, असेही म्हणता येणार नाही.

रस्ते व नाल्यांचा बॅकलाग
रवी जवळे - चंद्रपूर
चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात येऊन आता जवळजवळ तीन वर्षांचा कालावधी होत आहे. महानगरपालिकेच्या तिजोरीत निधीची कमतरता आहे, असेही म्हणता येणार नाही. असे असतानाही या महानगरातील अनेक वसाहती विकासापासून वंचित आहेत. लोकमतच्या ‘लोकमत जागर’ या अभियानात याचा प्रत्यय येत आहे. लोकमत चमूने आज अष्टभुजा प्रभागात फेरफटका मारला असता हा प्रभागही अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे दिसून आले. या प्रभागात रस्त्यांची समस्या कायम आहे. प्रभागात काही मोजक्या ठिकाणीच रस्त्यांची कामे झाली आहे. नाल्याही तुटलेल्या असून काही ठिकाणी नाल्याच नाही. महाकाली कॉलरी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे.
महानगरपालिका हद्दीतील महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, नागपूर मार्ग या मार्गाला लागून असलेल्या परिसरात विकास झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, या मार्गावरून बरीच बाहेरगावची मंडळी जाणेयेणे करतात. त्यांना प्रथमदर्शनी महानगराचा चांगलाच विकास झाल्याचे दिसून येत असावे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शहरातील अंतर्गत व टोकावरील वसाहतीचा अद्यापही पाहिजे तसा विकास झालेला नाही. रस्ते, नाल्या, पिण्याची पाणी, पथदिवे यासारख्या मुलभूत सोईची अद्याप नागरिकांना मिळालेल्या नाही.
लोकमत चमूने आज गुरुवारी अष्टभुजा प्रभागात फेरफटका मारला असता नागरिकांनी रस्ते व नाल्यांच्याच समस्या आवर्जुन सांगितल्या. अष्टभुजा प्रभाग हा बायबास मार्गावर शहराच्या शेवटच्या टोकावर वसला आहे. राजेश रेवल्लीवार व सुभेदिया कश्यप हे या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात. या प्रभागातील अष्टभुजा वार्डातील अष्टभुजा मंदिराच्या बाजुच्या परिसरातील रस्ते अतिशय निमुळते आहे. चारचाकी वाहन या रस्त्यांवरून जाऊ शकत नाही. काही रस्त्यांचे कामे सुरू आहेत. काही नाल्यांचीही कामे सुरू आहेत. मात्र गल्लोगल्लीतील काही रस्ते अद्याप उखडलेलेच आहे. काही नाल्या जुन्याच असलेल्या दिसतात. संत रविदास चौकात सिमेंट रस्त्यांची कामे झालेली दिसली. मात्र या परिसरात कचराकुंड्याच नाही. त्यामुळे कचरा रस्त्याच्या कडेलाच फेकला जातो. काही वेळा घराघरातील कचरा नालीत फेकला जातो. नाल्याही नियमित साफ केल्या जात नाही. अष्टभुजा माता मंदिराच्या बाजुच्या परिसरात पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन अतिशय लहान आहे. त्यामुळे नळाला मुबलक पाणी येत नाही. उन्हाळ्यात तर पाण्याची समस्या तीव्र होते. विशेष म्हणजे, या परिसरात सार्वजनिक नळ एकही नाही. हातपंप एक आहे, तोदेखील बंदच राहतो. त्यामुळे पाण्यासाठी उन्हाळ्यात नागरिकांना भटकंती करावी लागते. उल्लेखनीय असे की दीड महिन्यांपूर्वी नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी या परिसरात महानगरपालिकेने सर्वे केल्याचे नागरिक सांगतात. मात्र अद्यापही पाईप लाईन टाकण्याची प्रक्रिया पुढे सरकली नाही.
या परिसरात आणखी एक समस्या गंभीर आहे. अष्टभुजा मंदिराच्या बाजुने एक मोठा नाला वाहतो. पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन नागरिकांच्या घरातही पाणी शिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. यापूर्वी अनेकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले आहे. या वर्षीचा पावसाळा याला अपवाद ठरला. अष्टभुजा नगर मोठा वसाहत परिसर असूनही या ठिकाणी मोकळ्या जागा नाहीत. लहान मुलांना खेळासाठी एकही पटांगण नाही. तशी जागाच या परिसरात महानगरपालिकेने आरक्षित ठेवलेली दिसत नाही. सर्वत्र घरांचीच गर्दी झालेली दिसून येते. पुढे पटांगणाची मागणी नागरिकांकडून पुढे येऊ शकते.
अष्टभुजा प्रभागातील महाकाली कॉलरी परिसरातही रस्त्यांचा बॅकलाग दिसून येते. या पसिरातील रस्तेही उखडले आहे. येथील मुख्य रस्त्यांवरच डांबरीकरण करण्याची गरज आहे. अंतर्गत लहान रस्त्यांची तर दैनावस्था झाली आहे. महाकाली कॉलरी परिसरातील मुख्य रस्त्यावरील नाल्या जुन्या आहेत. ठिकठिकाणी या नाल्यांची काठं तुटलेली आहेत. महाकाली कॉलरी परिसरातील आतील वसाहती अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकामच करण्यात आलेले नाही. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. महाकाली कॉलरी परिसरात पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. या परिसरात अनेकांच्या घरात नळ नाही. विशेष म्हणजे परिसरात हातपंपांची व्यवस्था नाही. वेकोलिच्या बंकरचे पाणी सोडले जाते. याच पाण्याच्या भरोशावर येथील नागरिक आपली दैनंदिन कामे करतात. मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिक सांगतात. विशेष म्हणजे, या परिसरातूनही एक मोठा नाला वाहतो. पावसाळ्यात या नाल्याचे पाणी रस्त्यावर येते.