कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका माघारल्या

By Admin | Updated: July 29, 2015 00:45 IST2015-07-29T00:45:45+5:302015-07-29T00:45:45+5:30

खरिप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने सर्व बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

Backed Nationalized Banks In Debt Distribution | कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका माघारल्या

कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँका माघारल्या

लोकमत विशेष
चंद्रपूर : खरिप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने सर्व बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. मात्र कर्जासाठी शेतकऱ्यांवर विविध अटी लादून कर्ज देण्यास दिरंगाईचे धोरण बँकांनी अवलंबल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत कर्ज वाटप उद्दीष्टपुर्तीच्या केवळ ६७ टक्के कर्ज वाटप व्यावसायिक व राष्ट्रीयकृत बँकाद्वारे झाले असून अद्यापही ३२ टक्के कर्ज वाटप शिल्लक असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालातून मिळाली आहे.
कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकावर कारवाई करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. कोणताही शेतकरी आर्थिक अडचणीत राहू नये, त्याच्यावर जुने कर्ज थकीत असेल तरी नवीन कर्ज उपल्बध करून द्यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशाला राष्ट्रीयकृत व व्यावसायिक बँकांनी बगल दिल्याचे दिसून येत आहे.
खरिप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यातील ८१ हजार ८९१ शेतकऱ्यांना ६२३ कोटी २० लाख रूपयाचे तर रबी हंगामासाठी ६५ कोटी ६५ लाख रूपये कर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. यात खरिप हंगामासाठी १७ जुलैपर्यंत ५४१ कोटी ५७ लाख रूपयाचे कर्ज वाटप झाले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला खरिपासाठी ३८३ कोटी रूपयाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. या बँकेने १०० टक्के कर्ज वाटप केले आहे.
तर राष्ट्रीयकृत बँकाना १८० कोटी ७० लाख रूपयाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. मात्र यापैकी १८ हजार २४२ शेतकऱ्यांना केवळ १२३ कोटी २५ लाखाचे कर्ज वाटप केले आहे. या कर्ज वाटपाची टक्केवारी ६८ टक्के आहे. तसेच व्यावसायिक बँकांना १८ हजार ५८३ शेतकऱ्यांना १९३ कोटी २० लाख रूपयाचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते.
या बँकांनी सुद्धा १७ जुलैपर्यंत १२८ कोटी ५७ लाख रूपयाचे कर्ज वाटप केले आहे. याची टक्केवारी ६७ इतकी आहे. खरिप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकरी कामात व्यस्त आहेत. खत, बियाणे खरेदी करावे लागत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर न झाल्याने अडचणी येत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
पावसाच्या हुलकावणीने  चिंता वाढली
यावर्षी पाऊस सतत हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांत चिंता पसरली आहे. गतवर्षीचे कर्ज थकीत असताना नवे कर्ज घेऊन शेती करण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. मात्र यावर्षीही हमखास उत्पन्न होईल याची आशा नाही. त्यामुळे यावर्षी घेतलेले कर्ज आणि जुने थकीत कर्ज कसे फेडणार ही चिंता अनेक शेतकऱ्यांना लागली आहे.
विविध दाखल्यांसाठी दमछाक
राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्याला कर्जासाठी विविध दाखल्यांच्या अटी ठेवल्या असून हे दाखले मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. ना हरकत प्रमाणपत्र, कर्ज नसल्याचा दाखला, हिस्सेदारांचे सहमती पत्र असे अनेक दाखले कर्ज प्रकणाला जोडावी लागत आहेत. हे दाखले लवकर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची पायपीट होऊन आर्थिक व मानसीक त्रास सहन करावा लागत आहे.
उसणेवारी, उधारीवर खताची खरेदी
कर्जासाठी प्रकरण सादर करूनही कर्ज मिळण्यास दिरंगाई होत असल्याने अनेक शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मात्र पिकाला खताची आता आवश्यकता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी नातेवाईकाकडून उसणेवारी पैसे मागून, उधारीवर खत खरेदी करत असल्याचे ग्रामीण भागातील शेतकरी सांगतात. कर्ज प्रकरणे निकाली काढण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Backed Nationalized Banks In Debt Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.