बैलबंडीने शेतकरी धडकले तहसीलवर
By Admin | Updated: December 24, 2015 00:55 IST2015-12-24T00:55:24+5:302015-12-24T00:55:24+5:30
अपुऱ्या पावसामुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मूल तालुक्यातील धान, सोयाबीन, तूर, कापूस ही पिके पूर्णत: खराब झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

बैलबंडीने शेतकरी धडकले तहसीलवर
दुष्काळ जाहीर करा : मूल तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांचा सहभाग
मूल : अपुऱ्या पावसामुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मूल तालुक्यातील धान, सोयाबीन, तूर, कापूस ही पिके पूर्णत: खराब झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी पंचायत समिती मूल अंतर्गत बेंबाळ प्रभागाच्या १३ गावातील शेतकरी मूल तहसील कार्यालयावर बैलबंडीसह धडकले. यावेळी जवळपास २५० बैलबंड्यासह हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती होती.
उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार राजेश सरवदे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. धानाला ३५०० रुपये प्रति क्विंटल भाव द्यावे, संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, खतावर ५० टक्के अनुदान द्यावे, मूल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, गोसीखुर्दचे पाणी गोवर्धन उपकालव्यापर्यंत सोडावे, आणेवारी चुकीच्या पद्धतीने झाल्याने फेरआणेवारी करण्यात यावी, असोंलामेंढा कालव्याचे सब मायनर पावसाळ्याआधी नुतनीकरण करावे तसेच इतर महत्त्वाच्या मागण्यांची पुर्तता करावी अशा मागण्या निवेदनाद्वारे तालुका प्रशासनाला करण्यात आले.
यावेळी तहसीलदार राजेश सरवदे यांनी स्वत: बैलबंडी मोर्च्याजवळ जावून निवेदन स्वीकारले व मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी बेंबाळ, नवेगाव भूजला, नांदगाव, गोवर्धन, बोडाळा बुज, बोडाळा (खुर्द), कोरंबी, बाबराळा, चकदुगाळा, मालदुगाळा, भजाडी, सितळा आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)