बाबूपेठचा उड्डाण पूल ६१ कोटींच्या अंदाजपत्रकाला
By Admin | Updated: November 4, 2015 00:45 IST2015-11-04T00:45:52+5:302015-11-04T00:45:52+5:30
चंद्रपुरातील बाबूपेठ येथील रेल्वे रूळावरील बहुप्रतीक्षित उड्डाण पूल उभारण्याची स्थिती अंतीम टप्प्यात आली असली तरी,

बाबूपेठचा उड्डाण पूल ६१ कोटींच्या अंदाजपत्रकाला
नगर विकास मंत्रालयाच्या मान्यतेची प्रतीक्षा
चंद्रपूर : चंद्रपुरातील बाबूपेठ येथील रेल्वे रूळावरील बहुप्रतीक्षित उड्डाण पूल उभारण्याची स्थिती अंतीम टप्प्यात आली असली तरी, या पुलाच्या निर्मितीसाठी ६१ कोटी ५७ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकाला नगर विकास मंत्रालयाच्या प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा मात्र कायमच आहे. ही मान्यता मिळाल्यावरच आणि भूसंपादनाची कार्यवाही झाल्यावरच या पुलाच्या निर्मीतीच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.
बाबूपेठच्या उड्डाण पुलाच्या निर्मीतीभोवती शहराच्या विकासाचे राजकारण फिरत असले तरी अद्यापही या पुलासाठी असलेली तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नाही, हे तेवढेच स्पष्ट आहे. दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंत्यांनीच एका प्रसिद्धी पत्रकातून ही बाब स्पष्ट केली आहे. चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे यांच्या मतदार संघात येणाऱ्या बाबूपेठच्या उड्डाण पुलाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडला आहे. त्यामुळे या मार्गाने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना अकारण प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पुलाच्या मान्यतेतील सर्व अडथळे दूर झाल्याचे आमदार श्यामकुळे यांनी यापूर्वी सांगितले असले तरी, एवढ्या महिन्यानंतरही या पुलाच्या निर्मीतीच्या कामाला न झालेली सुरूवातच सर्व काही सांगून जाण्यास पुरेशी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे उड्डाण पुलासाठी सर्वसाधारण आराखडा तयार केला आहे. मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे अशा दोन विभागाचे लोहमार्ग रस्त्याला क्रॉस करतात. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या नकाशाला तत्वत: मान्यता दिली असून येथे पादचारीसाठी आणि दुचाकींसाठी तरतुद करण्यासाठी कळविले आहे. त्यानुसार अंडरपासचे नकाशेही मंजुरीसाठी रेल्वेकडे पाठविले आहेत.
पोचमार्गासाठी भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीही झाली आहे. या पुलासाठी राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने पाच कोटी रूपये मंजूर केले असून मध्य रेल्वेने २०१५-१६ या रेल्वेच्या अर्थसंकल्पातही या उड्डाण पुलाच्या कामाचा समावेश केला आहे. त्यामुळे या पुलाच्या निर्मीतीच्या आशा बळावल्या आहेत.
या संपूर्ण प्रकल्पाच्या कामासाठी ६१ कोटी ५७ लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. नगर विकास विभागाकडे ते पाठविण्यात आले आहे. या सोबतच ६९ घरांना या पुलामुळे बाधा पोहचणार आहे. या घरांच्या स्थलांतरणासाठी होणारी भूसंपादनाची प्रक्रियाही अद्याप पूर्ण व्हावयाची आहे. हे काम पूर्ण झाल्यावरच पुलाच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. तुर्तास तरी प्रतीक्षाच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
६९ कुटुंबीय म्हणतात, उड्डाण पुलाला विरोध नाही
‘उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर’ या मथळ्याचे वृत्त २ नोव्हेंबरच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच, या उड्डाण पुलाला ६९ कुटुंबियांचा विरोध नसल्याचे पूलबाधित नागरिकांच्या समितीमधील सदस्यांनी एका पत्रकातून स्पष्ट केले आहे. १३ सप्टेंबरला झालेल्या प्रत्यक्ष मोका पहाणीदरम्यान पालमंकत्र्यांनी पूलबाधित नागरिकाचे कसलेही नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन दिल्याने या पुलासाठी आपला विरोध नसल्याचे या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. या रेल्वे फाटकाचा त्रास जसा नागरिकांना आहे, तसा आपल्यालाही आहे. २० वर्षांपासून ही मागणी शासनदरबारी सातत्याने रेटली जात आहे. आपला विरोध असल्याचे सांगण्यामागे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. उड्डाण पूल लवकर झाला पाहीजे, असा सर्वांचा मानस असल्याचे या पत्रकातून समितीचे सदस्य विजय चांदेकर, स्नेहल रामटेके, प्रितपालसिंग भाटीया, अविनाश शेंडे, जयश्री घडसे, देवानंद बोबडे, केशव दारूंडे, वैशाली कांबळे आदींनी म्हटले आहे.