बाबासाहेबांचे विचार माणुसकीला श्रेष्ठ बनविणारे
By Admin | Updated: April 15, 2016 01:19 IST2016-04-15T01:19:22+5:302016-04-15T01:19:22+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.

बाबासाहेबांचे विचार माणुसकीला श्रेष्ठ बनविणारे
सुधीर मुनगंटीवार : जयंतीनिमित्त क्रांतीसूर्याला अभिवादन
चंद्रपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती विरहित समाज व्यवस्था, सामाजिक न्याय व समता प्रथापित करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून माणुसकीला श्रेष्ठ बनविण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करू या, असे आवाहन वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व मनपा आयुक्त सुधीर शंभरकर हे यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचावे, यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात १७० कोटींची तरतूद केली असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. बाबासाहेबांनी लंडन येथे वास्तव्य केलेले घर महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतले आहे. इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बाबासाहेबांचा आई-वडिलांचे वास्तव्य असलेल्या गावाचा तसेच माई रमाबार्इंच्या गावाचासुध्दा विकास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचे ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जयंती समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला.
त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या वर्षात करण्यात येणार आहे. आपणही त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प करू या, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला असंख्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)