विजयाची प्रतीक्षा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह

By Admin | Updated: May 17, 2014 02:03 IST2014-05-17T00:06:09+5:302014-05-17T02:03:55+5:30

तब्बल एक महिना सहा दिवसानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हंसराज अहीर विक्रमी मताधिक्याने विजयी झालेत.

Awaiting victory and the enthusiasm of the party workers | विजयाची प्रतीक्षा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह

विजयाची प्रतीक्षा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह

चंद्रपूर : तब्बल एक महिना सहा दिवसानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हंसराज अहीर विक्रमी मताधिक्याने विजयी झालेत. तत्पूर्वी पहिल्याच फेरीत अहीर यांनी आघाडी घेताच, विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला.

येथील उद्योग भवनात शुक्रवारी मतमोजणीची प्रक्रीया पार पडली. निकालाची उत्सुकता घेऊन जवळपास सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार उद्योग भवन परिसरात गोळा झालेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या मानाने गर्दी अपेक्षेपेक्षा अतिशय कमी होती. त्यामुळे आपसूकच पोलिसांवरील ताणही कमीच होता. असे असले तरी खबरदारी म्हणून आज सकाळी ६ वाजतापासूनच पोलीस अधिकारी, कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी बंदोबस्तासाठी हजर झालेत. सुरूवातीची मतमोजणीची प्रक्रीया अतिशय मंदगतीने सुरू झाली. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्यासाठी बराच विलंब झाला. परिणामी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमधील उत्सुकता अधिक ताणल्या गेली. अनेकजण मोबाईलवरून आपल्या मित्र मंडळींना फोन करून निकालाचा आढावा घेताना दिसत होते. सकाळी १0 वाजताच्या सुमारास मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा निकाल अधिकृतरित्या जाहीर झाला. त्यात भाजपाचे खासदार हंसराज अहीर यांनी नऊ हजार ८२३ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे भाजपाच्या गोटात एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला. येथील जटपुरा गेट परिसरात अहीर यांच्या सर्मथकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

प्रत्येक फेरीतच अहीर यांना आघाडी मिळत असल्याने दुपारनंतर भाजपाचे कार्यकर्ते हाती झेंडे घेऊन रस्त्यावर दिसू लागले. काहीजण ‘हंसराजभैय्या आगे बढो हम तुम्हारे साथ है, अब की बार मोदी सरकार’ असे नारे देत मोटारसायकलवर फिरत होते. 

मतमोजणीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरातील जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका चौक, गिरनार चौक, गांधी चौक यासह महत्वाच्या भागात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. (प्रतिनिधी)

 

Web Title: Awaiting victory and the enthusiasm of the party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.