भरपाई देण्यास वेकोलिची टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 00:39 IST2016-02-13T00:39:20+5:302016-02-13T00:39:20+5:30
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी खुल्या कोळसा खाणीकरीता गोवरी शेतशिवारातील चिंचोली नाल्यांचा ...

भरपाई देण्यास वेकोलिची टाळाटाळ
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना : नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी खुल्या कोळसा खाणीकरीता गोवरी शेतशिवारातील चिंचोली नाल्यांचा प्रवाह बदलविल्यामुळे व नाल्याच्या काठावर मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्यामुळे अल्पशा पावसामुळे सुद्धा कृत्रिम पूरस्थिती निर्माण होते. परिसरातील शेकडो एकरातील शेती पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिने नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र वेकोलिने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना केली आहे.
राजुरा तालुक्यातील सास्ती-गोवरी-पोवनी परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. नव्यानेच पोवनी-२ व पोवनी-३ अशा दोन कोळसा खाणीही सुरू झाल्या आहेत. वेकोलि कोळसा उत्पादनासाठी वाटेल तशा पद्धतीने प्रयत्न करीत असून नियमबाह्य व धोकादायक कामे करीत आहे. त्यात शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या जीवाचाही विचार केला जात नाही.
वेकोलि कोळसा खाणीकरीता परिसरात असलेल्या नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह सुद्धा बदलविला आहे. नाल्याच्या काठावरच उत्खनन केलेले मातीचे महाकाय ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे अल्पशा पावसामुळे सुद्धा कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असून गोवरी- पोवनी परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होते. तर गोवरी गावात सुद्धा पाणी शिरून मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. परंतु वेकोलि याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असून त्यावर कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे.
यावर्षीच्या हंगामात जून २०१५ ला कृत्रिम पूरस्थिती निर्माण होऊन परिसरातील दोनशे एकरातील लागवड केलेले पीक नष्ट झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून वेकोलि व शासनाकडे मागणी केली होती.
त्यानुसार उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी परिसराचे सर्व्हेक्षण करुन शेतीचे नुकसान झालेल्या २९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश नोव्हेंबर २०१५ ला वेकोलिला दिले होते. परंतु आजपर्यंत त्या शेतकऱ्यांना सदर नुकसान भरपाई मिळाली नसून शेतकरी नुकसान भरपाईच्या आशा बाळगून आहेत. २० जानेवारीला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सुद्धा नुकसान भरपाई द्यावी असे पत्र वेकोलिला दिले आहे. परंतु वेकोलिने याकडे दुर्लक्षच केले आहे. (वार्ताहर)
नियमांचे होत नाही पालन
वेकोलिने कोळसा खाणीकरीता परिसरातील जिवंत नाल्यांचा प्रवाह बदलविला. सदर प्रवाह बदलविण्यासाठी रितसर शासनाची मंजूरी घेतली असली तरी परवानगी देताना जलसंधारण विभागाने घातलेल्या अटींचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. वळविलेल्या नाल्याची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गाळ काढणे, रुंदी व खोली नियमानुसार ठेवणे अशा विविध अटी आहेत. परंतु वेकोलि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
वेकोलिने वळविलेल्या नाल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आमच्या शेतीचे नुकसान होत आहे. वेळोवेळी वेकोलि प्रशासन व शासनाकडे नुकसान भरपाई मागणी केल्या गेली. परंतु याकडे दुर्लक्षच होत गेले. यावेळी मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेकोलिला आदेश देऊनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने वेकोलिची बळबजरी उघड झाली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी.
- रुपेश पाचभाई,
शेतकरी गोवरी