अवधी संपूनही रक्कम देण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: February 7, 2015 00:36 IST2015-02-07T00:36:50+5:302015-02-07T00:36:50+5:30
आदर्श नागरी सहकारी पत संस्था चंद्रपूर शाखा घुग्घुसच्या अनेक खातेदारांच्या मुदत ठेव व पिग्मी खात्यातील रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

अवधी संपूनही रक्कम देण्यास टाळाटाळ
चंद्रपूर : आदर्श नागरी सहकारी पत संस्था चंद्रपूर शाखा घुग्घुसच्या अनेक खातेदारांच्या मुदत ठेव व पिग्मी खात्यातील रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शाखा व्यवस्थापक अभिकर्त्याना जीवे मारण्याची देत आहे. अनेक संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी देऊनसुद्धा कारवाई होत नाही आणि रक्कम परत करत नसल्याने त्रस्त झालेल्या अभिकर्ता व खातेदारांनी तत्काळ रक्कम परत न मिळाल्यास १४ फेब्रुवारीपासून घुग्घुस येथील गांधी चौकात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून दिला. यावेळी संस्थेचे अभिकर्ता नंदू सपाट, नंदू नंदवाणी, एस. पी. गेडाम, रामिलवार, खातेदार विनोद वैरागडे, डॉ. विलास बोबडे यांच्यासह अनेक खातेदार उपस्थित होते.
आदर्श नागरी सहकारी संस्था चंद्रपूर शाखा घुग्घुसच्या चार अभिकर्त्यांनी विविध खातेदारांकडून लाखो रुपये जमा करुन संस्थेच्या कार्यालयात जमा केले. तशी खाते पुस्तकात नोंद आहे. अनेक खातेदारांच्या ठेवीची मुदत ठेवीचा अवधी संपून एक वर्ष झाले. मात्र सदर रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. अध्यक्ष, सचिव आणि संस्थेचे व्यवस्थापक राजेश कारकाळे यांनी या विषयात वेळकाढू धोरण स्वीकारले आहे, तर व्यवस्थापकाकडून जीवे मारण्याच्या धमक्या देत कुठे जायचे आहे, तेथे जा. अधिकारी आमचे आहेत, असे सांगितले जाते. याप्रकाराबाबत त्रस्त अभिकर्ता आणि खातेदारांनी ४ सप्टेंबरला घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता सहाय्यक निबंधक आर. टी. अगले यांच्याकडे अहवाल मागितला. मात्र चार महिने होऊनही तक्रारीची व पोलिसांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या मागितलेला अहवाल अद्यापही देण्यात आला नाही.
सदर शाखा चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित असली तरी संस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील लोकांना खातेदार बनवून घेतले. त्यांच्या ठेवीची रक्कम मिळावी म्हणून अनेकदा चकरा मारल्या. नागपूर अधिवेशनाच्या काळात सहकार मंत्र्याचे लक्ष वेधले असता त्यांनी संस्थेच्या अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापकांना बैठकीसाठी बोलावले मात्र हे अधिकारी बैठकीला उपस्थित झाले नाहीत, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. या शाखेत एकूण १५० खातेदार असून त्यांची ३० लाखांपेक्षा अधिक रक्कम आहे. गेल्या काही दिवसांपासून सदर संस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याने खातेदारांची तारांबळ उडाली आहे. रक्कम परत न मिळाल्यास १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. यावेळी अनेक खातेदार उपस्थित होते. (वार्ताहर)