गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरणासाठी या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:20+5:302021-05-05T04:46:20+5:30

चंद्रपूर : लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांनी ...

To avoid congestion, register online and get vaccinated | गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरणासाठी या

गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरणासाठी या

चंद्रपूर : लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांनी तसेच ४५ वर्षावरील जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून दिलेल्या वेळेतच लसीकरण केंद्रावर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना टास्क समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, पोलीस उपअधीक्षक शेखर देखमुख, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करताना प्रत्येक केंद्रावर ६० टक्के ऑनलाईन नोंदणीद्वारे तर ४० टक्के थेट या समीकरणाद्वारे लसीकरण करावे. या ४० टक्के लाभार्थ्यांनाही टोकन देऊन टाईम स्लॉटप्रमाणे सर्वांचे लसीकरण करावे व लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याबाबत केंद्रप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी औषध साठा, इंन्जेक्शनचे वाटप, ऑक्सिजन साठा याबाबत माहिती घेतली. तसेच कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांवर पोलीस विभागाने लक्ष ठेवून त्यांना विलगीकरणात पाठविण्याच्या सूचना दिल्या. मनपा व जिल्हा आरोग्य विभागाने ॲन्टिजेन कोरोना टेस्ट किट पर्याप्त मात्रेत साठा करून ठेवाव्या. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑक्सिजन बेडसाठी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तेथील सी-विंग तातडीने रिक्त करून घेण्याच्या सूचना अधिष्ठाता यांना दिल्या.

बैठकीला डॉ. प्रकाश साठे, डॉ. अविष्कार खंडारे, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रीती राजगोपाल, डॉ. प्रतीक बोरकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बाॅक्स

पहिल्या दिवशी १,१९३ जणांचे लसीकरण

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असून पहिल्या दिवशी १,१९३ नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४४ हजार ९८१ डोस दिले असल्याची माहिती लसीकरण अधिकारी संदीप गेडाम यांनी दिली.

Web Title: To avoid congestion, register online and get vaccinated