मोर्चाद्वारे वेधले चंद्रपूरच्या प्रदूषणाकडे लक्ष
By Admin | Updated: December 16, 2015 01:25 IST2015-12-16T01:25:21+5:302015-12-16T01:25:21+5:30
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना विविध गंभीर आजार उद्भवत आहेत.

मोर्चाद्वारे वेधले चंद्रपूरच्या प्रदूषणाकडे लक्ष
प्रदूषण दिले, वीज सवलत द्या : नागपूर विधानभवनासमोर आंदोलन
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना विविध गंभीर आजार उद्भवत आहेत. जिल्ह्यामध्ये धुळीचे प्रदूषण व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याचा अहवाल निरी यासारख्या संस्थेने दिलेला आहे. यावर शासनाने उपाययोजना करून जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी नागपूर विधानभवनासमोर १४ डिसेंबरला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सीटीपीएस, इतर पॉवर प्लाँट व २८ कोळसा खाणी, सिमेंट प्लाँट यामुळे नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आहे. हृदयविकार, अॅसीडीटी, टी.बी., स्किन विकार या आजाराने गत पाच वर्षामध्ये ४२० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या यादीत दर्शविलेली आहे. म्हणून जिल्ह्याला सरकारने प्रदूषण तर दिले, सवलत काय देणार, हा जनतेचा प्रश्न आहे.
त्यामुळे चंद्रपुरातील नागरिकांना विद्युत बिलामध्ये ५० टक्के सबसिडी द्यावी, सुपर मल्टी स्पेशालिटी सामान्य रुग्णालय द्यावे, जिल्ह्यातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मनपा वृक्ष कर गोळा करते. या वृक्ष कराच्या रक्कमेची चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यातील जुन्या पाईपलाईन कालबाह्य झाल्या आहेत. यामुळे पाण्याची गळती व समस्या निर्माण झाली आहे. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. यामुळे चंद्रपूर शहरात नविन पाईप लाईन टाकावी. शहर महानगरपाालिकेने केलेली गृहकर वाढ मागे घ्यावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात राजेश बेले, नितीन गाडगे, सुमीत ढोकपांडे, चेतन ढोक, अभी वाडरे, शुभम पोटदुखे, राज पोटदुखे, फिरोज शेख, सुजीत वळस्कर, रोशन गिरडकर, राजेंद्र टिपले, जितेश झाडे, संकेत खराडे, प्रज्योत चिलके आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)