सावरगावात शासकीय जागा बळकाविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 20, 2015 00:47 IST2015-12-20T00:47:39+5:302015-12-20T00:47:39+5:30
सावरगाव येथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवर तेथीलच एका व्यक्तीने अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे.

सावरगावात शासकीय जागा बळकाविण्याचा प्रयत्न
अवैध बांधकाम : पदाधिकाऱ्यांची चुप्पी
नागभीड : सावरगाव येथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागेवर तेथीलच एका व्यक्तीने अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे. दिवसाढवळ्या हे बांधकाम सुरू असले तरी ग्रामपंचायत मात्र चुप्पी साधून असल्याने विविध तर्क लावले जात आहेत.
सावरगावच्या वाढोणा रोडवर ही जागा असून या जागेचा भूमापन क्र. ४६० असून शासकीय नोंदीप्रमाणे जागेची आराजी ०.५१ हे.आर. आहे. या जागेसंदर्भात उपलब्ध माहितीनुसार सातबारावर सरकार कुरण अशी नोंद असली तरी जिल्हा परिषद नोंदीप्रमाणे ही जागा शाळेच्या क्रीडांगणासाठी राखून ठेवण्यात आली आहे. असे असले तरी २००४-०५ या वर्षी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून गावातील एका मंदिराला देण्याचा निर्णय घेतला होता.
पण मंदिराच्या विश्वस्तांनी या जागेवर कोणतेही बांधकाम केले नाही. ही जागा खुली असल्याचे बघून गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती धर्मराव रामजी बोरकर यांची या जागेवर नियत गेली व त्याने पदाधिकाऱ्यांशी संधान साधून या जागेवर दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरू केले. दिवसा ढवळ्या हे बांधकाम सुरू असले तरी ग्रामपंचायत मात्र यावर चुप्पी साधून आहे. यावरून बांधकामाला ग्रामपंचायतीचा आशिर्वाद तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)