मतदारांचा कल वळविण्यासाठी उमेदवारांकडून शर्तीचे प्रयत्न
By Admin | Updated: December 28, 2015 01:31 IST2015-12-28T01:31:40+5:302015-12-28T01:31:40+5:30
जानेवारी महिन्याच्या १० तारखेला होणाऱ्या येथील नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे.

मतदारांचा कल वळविण्यासाठी उमेदवारांकडून शर्तीचे प्रयत्न
गोंडपिपरी: जानेवारी महिन्याच्या १० तारखेला होणाऱ्या येथील नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे. प्रभागातील मतदारांचा कल वळविण्यासाठी काही उमेदवारांकडून मेजवाण्यांसह दररोज प्रभागात जावून नागरिकांची विचारपूस तसेच त्यांचेप्रती सहानुभूती यांचे दर्शन घडत असल्याची माहिती आहे.
येथील ग्रामपंचायतील नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होताच सर्व नागरिकांचे लक्ष वेधणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला पुढील महिन्याच्या पूर्वाधात पारपडणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत सत्ता काबिज करण्याच्या उद्देशाने राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस-भाजपा या बड्या पक्षांचे उमेदवार जरी सर्व प्रभागातून उभे करण्यात आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तथा अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत निवडणूक लढण्याचा चंग बांधून उमेदवारांना उभे केले आहे, तर बड्या पक्षांकडून तिकीट नाकारल्याने या नवडणुकीत रूसवे-फुगवे यातून प्रचंत तिढा निर्माण झाला असून २८ डिसेंबरपर्यंत वरिष्ठांनी या गंभीर बाबींकडे लक्ष न घातल्यास निवडणुकीचे समिकरण वेगळीकडे वळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून कानावर येत आहे.
१७ प्रभागांसाठी १०२ उमेदवार आज रिंगणात असून या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा प्रणाला लागली आहे. अशातच राजकीय वर्तुळातील बड्या पक्षांच्या नेतेमंडळींनी गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीवर विशेष लक्ष देणे सुरु केले असून पक्षांतर्गत बैठका व समिकरणांची जुळवा-जुळवा करणे सुरु केल्याचे दिसून येते.
अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा कल वळविण्यासाठी काही उमेदवारांनी मेजवाण्यांच्या आयोजन करण्यातही आगेकूच केल्याची माहिती आहे, तर प्रशासनाच्यावतीने मतदारांना जनजागृतीपर फलके, रॅली व अन्य माध्यमातून संदेश पोहचविण्याचे कार्य युद्धपातळीवर चालविले आहे. जुन्या- नवीन चेहऱ्यांमध्ये गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीचा महासंग्राम चांगलाच रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विकासात्मकदृष्ट्या काम करणाऱ्या उमेदवारांना मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ विकास करणाऱ्या उमेदवारांचं चांगभलं होईल, असे दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)