खंडणी मागणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधारास अटक करा
By Admin | Updated: December 22, 2016 01:57 IST2016-12-22T01:57:44+5:302016-12-22T01:57:44+5:30
येथील धान्य व्यापारी व कपडा व्यापारी नंदकिशोर सारडा यांना धमकी देवून ५० हजाराची खंडणी मागणारा सचिन मुळेवार जेरबंद झाला.

खंडणी मागणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधारास अटक करा
सावली येथील प्रकरण : पकडलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
सावली : येथील धान्य व्यापारी व कपडा व्यापारी नंदकिशोर सारडा यांना धमकी देवून ५० हजाराची खंडणी मागणारा सचिन मुळेवार जेरबंद झाला. पण या टोळीचा मुख्य सुत्रधार व ज्याच्याकडे सर्व माहिती गोळा करण्याची जबाबदारी असते, तो ढगल्या नावाचा व्यक्ती मोकाट असल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे. अमोल मुळेवार हा टोळीचा सदस्य आहे. म्होरक्या कोण हे सर्वांना माहित आहे. तेव्हा ठाणेदारांनी अमोल मुळेवारला बोलते केल्यास संपूर्ण टोळीचा पर्दाफाश होवू शकतो. त्यामुळे सुत्रधाराला अटक करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या एक-दोन वर्षापासून माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून मिरविणारा एक घरजावई म्हणून आलेला युवक सावलीच्या तरुण मुलांना हाताशी धरुन खंडणी, ब्लॅकमेल, माहिती अधिकाराचा धाक दाखवून आपली टोळी बनविण्यात यशस्वी ठरला. नगर पंचायत प्रभाग १६ मधील निवडणुकीतील उमेदवाराचा फोन टेपिंग याच टोळीने करून पैशाची मागणी केली. आडेपवार अतिक्रमण प्रकरण, आनंद बेजगमवार धमकी प्रकरण, गहू खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याचे प्रकरण, दारू विक्रेते, ठेकेदार धमकी प्रकरण याच टोळीने घडवून आणले. सदर प्रकार सारडा यांच्या धाडसीपणामुळे व ठाणेदार धुळे यांच्या चानाक्ष बुद्धीने या टोळीचा एक सदस्य गजाआड झाला. बाकीचे बाहेर भटकत आहेत. या टोळीने मुलच्या शिक्षकाच्या घरासमोरील अतिक्रमणाचा मुद्दासुद्धा खंडणी घेऊन सोडविला होता. त्यामुळे या टोळीचे मनोबल वाढले असल्याने जेथे पैसे मिळतात तिथे हात व धाक दाखवून खंडणी गोळा करायची व कोणतेही प्रामाणिक व मेहनती कामे न करता जीवन जगण्याचा फार्मूला या टोळीने शहरात निर्माण केला आहे. त्यामुळे युवक मंडळी बिना त्रासाचे व सहज सोपे काम म्हणून या टोळीत सहभागी होत आहेत. या संपूर्ण टोळीला अटक केल्याशिवाय खंडणीसारखे ग्रामीण भागात होेणारे प्रकार संपुष्टात येणार नाही.
त्यामुळे पोलिसांनी चौकशी करून मुख्य सुत्रधारास अटक करावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)