अट्टल दुचाकी चोरट्याला अटक, नऊ मोटारसायकल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:42+5:302021-03-24T04:26:42+5:30
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहे. प्रदीप उर्फ ...

अट्टल दुचाकी चोरट्याला अटक, नऊ मोटारसायकल जप्त
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहे. प्रदीप उर्फ सोनू केवळराम मेश्राम (२४) रा. रणमोचन असे आरोपीचे नाव आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी (खुर्द) विकास नगर येथील एका इसमाची नवीन दुचाकी ८ फेब्रुवारीला घराच्या अंगणातून चोरीला गेली होती. सदर इसमाने सर्वत्र शोध घेतला परंतु कुठेही दुचाकी मिळाली नाही. दुचाकी नवीन असल्याने दुचाकीची कागदपत्रेसुद्धा त्याच्याकडे नव्हती. ब्रह्मपुरी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. २२ मार्च रोजी डिबी पथकातील एक तुकडी शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना चोरीला गेलेली नवीन दुचाकीसह अन्य चोरीच्या दुचाकी आरोपी प्रदीप उर्फ सोनू केवळराम मेश्राम त्याचा साथीदार सचिन ऊर्फ बादशाह नगराळे रा. सोमनाथपुरा राजुरा यांनी विक्रीसाठी रणमोचन येथे प्रदीप उर्फ सोनू मेश्राम याच्या राहत्या घराच्या मागील शिवारात तणसीने झाकून ठेवल्या असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केला असता त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीकडून एकूण नऊ मोटारसायकल अंदाजे किंमत ५ लाख ५० हजार रुपये आढळून आल्याने प्रदीप उर्फ सोनू मेश्राम (२४) याच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात कलम 379 भादंवि अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे, अरुण पिसे, अमोल गिरडकर, योगेश शिवणकर, संदेश देवगडे, अजय कटाइत, मुकेश गजबे, विजय मैंद, नरेश कोडापे, शुभांगी शेमले यांनी केली.