चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत वातावरण तापले
By Admin | Updated: April 6, 2016 00:43 IST2016-04-06T00:43:45+5:302016-04-06T00:43:45+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १७ एप्रिलला होऊ घातली आहे.

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत वातावरण तापले
१७ ला निवडणूक : १८ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात
चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १७ एप्रिलला होऊ घातली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून १८ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. १७ एप्रिलला निवडणूक व १८ ला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार असल्याने उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न दोन कोटींच्या घरात आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ३१ डिसेंबर २०१५ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर मात्र वर्षभर प्रशासक मंडळाने बाजार समितीचा कारभार सांभाळला. त्यानंतर शासकीय पॅनल बाजार समितीवर बसले.
७ आॅगस्ट २०१५ रोजी मुख्य प्रशासक म्हणून देवराव भोंगळे यांनी कारभार स्वीकारला होता. दरम्यानच्या काळात न्यायालयाने मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सहकार विभागाला दिले होते. त्यानुसार मुदत संपलेल्या बाजार समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम सहकार विभागाने जाहीर केला. अर्ज भरणे, मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली आहे. उमेदवारांना काही दिवसांपूर्वीच चिन्ह वाटप झाले असल्याने आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात १८ उमेदवारांचा समावेश असून सेवा सहकारी संस्थेच्या गटातून एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातून ११ उमेदवारांना निवडून द्यायचे आहेत. ग्रामपंचायत गटात सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यातून चार उमेदवारांना निवडून द्यायचे आहेत. व्यापारी - अडते मतदारसंघातून पाच उमेदवार असून, त्यातील दोन, तर हमाल-मापारी गटातून एक उमेदवार निवडून येईल. बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)