चंद्रपूर : शहरातून दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेत पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याआधारावर पोलिसांनी नाकाबंदी करुन अट्टल वाहन चोरट्यास जेरबंद केले. यावेळी त्याच्याकडून नऊ मोटारसायकल जप्त केल्या. राजू ऊर्फ राजकुमार बालाजी धुर्वे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपल्या पथकाला शहरात पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील तसेच संशयित आरोपींना तपासून गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरत असल्याची माहिती मिळताच जटपुरा गेटवर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी राजू ऊर्फ राजकुमार धुर्वे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने मोटारसायकल चोरीची असून पुन्हा आठ मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी चार लाख ५० हजार रुपये किमतीच्या सर्व नऊ मोटारसायकल जप्त केल्या. या मोटरसायकल चंद्रपूरसह वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे समोर आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार राजेंद्र खनके, दीपक डोंगरे, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे आदींनी केली.
º