विभागातील पहले ग्रामीण घरकूल मार्ट आष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:52+5:302021-01-13T05:12:52+5:30
भद्रावती : सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्त्वाकांक्षी धोरण असून त्या अंतर्गत भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत आष्टा येथे नागपूर ...

विभागातील पहले ग्रामीण घरकूल मार्ट आष्टात
भद्रावती : सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्त्वाकांक्षी धोरण असून त्या अंतर्गत भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायत आष्टा येथे नागपूर विभागातील पहिले ग्रामीण घरकुल मार्ट होणार आहे.
उमेद अभियानांतर्गत महिला शक्ती ग्राम संघ ग्रामीण घरकुल मार्ट ग्रामपंचायत आष्टा येथे नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाले .याप्रसंगी गटविकास अधिकारी मंगेश आरेवार, श्याम मडावी, भारत राठोड, राकेश तुरारे, मिलिंद नागदेवते, ग्राम संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना , कोलाम आवास योजना इत्यादी योजना घरकुलासाठी राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी गतिमान व गुणवत्तापूर्वक होण्याकरिता राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या शंभर दिवसांच्या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण भागात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
घरकुल मार्ट अंतर्गत घरकुल लाभार्थींना घर बांधण्यासाठीचे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. घरकुल मार्ट सुरू होण्यापूर्वी लाभार्थींना घरकुलाकरिता लागणारे सर्व साहित्य चंदनखेडा, शेगाव, वरोरा येथून आणावे लागत होते. आता लाभार्थींचा वाहतुकीचा खर्च तसेच वेळसुद्धा वाचणार आहे. या घरकुल मार्टचा फायदा आष्टा ग्रामपंचायत परिघातील मानोरा सिं, कारेगाव, किन्होळा, वडाळा तुकूम ,कोकेवाडा तु, सोनेगाव, काटवल , घोसरी, पळसगाव, रानतळोधी अशा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या सुमारे आठ ते दहा गावांना होणार आहे. तसेच ग्रामपंचायत आष्टा येथील जवळजवळ १२५ घरकुल लाभार्थ्यांना सर्व साहित्य माफक दरामध्ये चांगल्या गुणवत्तेचे उपलब्ध होणार असल्यामुळे त्यांना थेट फायदा होणार आहे. घरकुल मार्ट हे नाविन्य पूर्व उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवत असल्याचे गट विकास अधिकारी मंगेश आरेवार यांनी सांगितले.
महिला शक्ती ग्रामसंघ आष्टाची स्थापना १९ सप्टेंबर २०१७ रोजी झाली. एकूण २४८ महिला यामध्ये समाविष्ट आहे. तसेच ग्राम संघाला एकूण २४ समूह जोडलेले आहेत. आतापर्यंत ग्राम संघाची उलाढाल जवळपास १६ लाख एक हजार इतकी आहे.