आशा वर्कर गटप्रवर्तकांचा मोर्चा
By Admin | Updated: December 25, 2016 01:23 IST2016-12-25T01:23:27+5:302016-12-25T01:23:27+5:30
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने नागपूर विधानसभेवर राज्यव्यापी हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला.

आशा वर्कर गटप्रवर्तकांचा मोर्चा
वाढीव मानधन देणार : आरोग्य राज्यमंत्र्याचे आश्वासन
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने नागपूर विधानसभेवर राज्यव्यापी हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला. आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आशा वर्कर व गटप्रवर्तकांना वाढीव मानधन देण्याचे आश्वासन दिले.
आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी मंत्रालयात शासनाचे प्रतिनिधी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दोन बैठकी झाल्या. चर्चेअंती आशा व गटप्रवर्तकांना इतर राज्याप्रमाणे मानधन, पात्रतेनुसार केरळच्या धर्तीवर रिक्त पदावर परीक्षा घेवून समावेश, ३०० रुपये प्रतिमाह मोबाईल भत्ता, स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या आशांना राजीनामा द्यावा लागणार नाही. तसेच यवतमाळ न्यायालयाच्या निर्णयानुसार वेतन लागू करण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मंत्री व अधिकारी यांनी दिले होते. दिलेले शब्द पाळा किंवा काहीच देऊ शकत नाही, असे जाहीर करा, यासाठी आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ. दिलीप उटाणे, संघटनेचे सरचिटणीस कॉ. सुमन पुजारी,कॉ. मंदा डोंगरे, कॉ. वैशाली जुपाका यांच्या नेतृत्त्वात विशाल हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी चर्चेमध्ये आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख म्हणाले की, आशा व गटप्रवर्तकांना मानधनसाठी ३० जानेवारीला परत एकादा बैठक घेऊन मानधन वाढ व इतर प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीधर वाढई, प्रकाश रेड्डी, रवींद्र उमाटे, सविता बोकडे, मंदिरा देवतळे, उषा नंदनवार, हेमा नाकाडे, हिमाली वाघमारे, पल्लवी बुरांडे, जयश्री डोंगरवार, सुरेखा गोतावळे, नलिनी पेटकर, संगीता गोरे, किरण दुर्गे, शितल मुंडे, लता चांदेकर, आशा रामटेके, प्रिती गेडाम यांच्या नेतृत्त्वात महिला सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)