गोंडपिंपरीत कृत्रिम पाणी टंचाई
By Admin | Updated: May 12, 2016 01:07 IST2016-05-12T01:07:11+5:302016-05-12T01:07:11+5:30
शासनाने जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी नळयोजना कार्यान्वित केल्या.

गोंडपिंपरीत कृत्रिम पाणी टंचाई
नागरिक त्रस्त : नगर पंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे
गोंडपिपरी : शासनाने जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी नळयोजना कार्यान्वित केल्या. यासाठी शासनाने प्रादेशिक, ग्रामीण व जल प्राधिकरणाच्या अनेक योजनांमार्फत कोट्यवधींचा निधी खर्चून जनतेला पाणी पुरविण्याचे कार्य होत आहे. मात्र दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणण्याच्या कुप्रथेमुळे आता जनसामान्यांना पिण्याचे पाणी मिळणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याचा प्रत्यय गोंडपिंपरी शहरात दिसून येत आहे.
शहरात नगरपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेमार्फत नागरिकांपर्यंत पाणी पोहोचविल्या जाते. मात्र याच नळ योजनेतील काही नळ कनेक्शन धारकांनी शुद्ध पाणी साठवणुकीसाठी टिल्लू पंपाच्या वापरातून अतिरिक्त पाणी उपसत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड जात आहे.
तालुक्यातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांच्या आरोग्यास विपरीत परिणाम होत आहे. या कूपनलिका व विहीरीच्या पाण्यामुळे विविध आजार होत असल्याने नळ योजनेद्वारे मिळणाऱ्या पाण्याची मागणी अधिक आहे. शहराचा पाणी पुरवठा येनबोथला नदीवरून तर शुद्धीकरण सुरगाव येथून होत असल्याने शहरातील प्रभाग १, २ व ३ या प्रभागातून पाणी वाटपाला सुरूवात होते. तर प्रभाग ४, ५, ६ ७ व ८ या प्रभागामध्ये सार्वजनिक नळ, बाजारपेठ व दाट वस्ती असल्याने येथे मुबलक पाणी पुरवठा करणे व ९ ते १७ या प्रभागापर्यंत पाणी पोहचविणे हे नळ योजनेचे उद्दिीट आहे. मात्र नदीपासून येणाऱ्या जलवाहिन्यांमधून नेहमीच पाणी गळती तर शहराच्या मध्यभागातून व शेवटपर्यंत असलेल्या लोकवस्तीतील काही टिल्लू पंपधारक या नळयोजनेच्या प्रणालीत अडथळा निर्माण करतात. अनेक नागरिक अतिरिक्त पाणी उपसा करण्यात यशस्वी ठरत आहेत. परिणामी इतर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची पाळी आहे.
या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी नगर पंचायतीने या विरोधात ठोस पाऊस उचलून टिल्लू पंपधारकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र असे असले तरी नगरपंचायतीच्या कारवाईला न जुमानता काहींकडून आजही नळयोजनेच्या पाण्याचा गैरकायदेशीर उपसा सुरूच आहे. परिणामी शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना कारवा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)