वनमाफिया सरपंचाला अटक करा
By Admin | Updated: April 18, 2015 01:08 IST2015-04-18T01:08:09+5:302015-04-18T01:08:09+5:30
पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा (माल) येथील वनजमिनीवर खोटा वनहक्क दावा सादर करून त्यावरील सागवान वृक्षाची कत्तल करणाऱ्या वनमाफिया सरपंचाला तातडीने अटक करा,...

वनमाफिया सरपंचाला अटक करा
चंद्रपूर: पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा (माल) येथील वनजमिनीवर खोटा वनहक्क दावा सादर करून त्यावरील सागवान वृक्षाची कत्तल करणाऱ्या वनमाफिया सरपंचाला तातडीने अटक करा, या मागणीसाठी वेळवा येथील ग्रामस्थांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा तिसरा दिवस असला तरी अद्याप या उपोषणाची दखल घेण्यात आली नाही.
अजय सारंग लोणारे असे सरपंचाचे नाव असून तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्याने वेळवा (माल) येथील सर्वे नं.५७ वरील १० ते १२ एकर जमिनीवर खोटा वनहक्क दावा सादर करून ती जमिन बळकावण्याचा प्रयत्न केला, असा उपोषणकर्त्या ग्रामस्थांचा आरोप आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या जमिनीवरील एक हजार ८५१ झाडांची बेकायदेशिर कत्तल केली. अजय लोणारे यांनी पोंभुर्णाचे तहसीलदार, कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनक्षेत्र सहाय्यक गोंगले यांना हाताशी धरून कागदपत्रांची जुळवाजुळव केली. त्या आधारे वनहक्क दावा सादर केला, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी याविरोधात २०१४ पासून सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदने देऊन हा प्रकार उजेडात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वन विभागाने या निवेदनांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे १५ एप्रिलपासून गावकऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात विलास भंडारे, कवडू सुरपाम, सारंग कुळमेथे, रणधिर जाधव, सुकरू कायरकर, दिवाकर राऊत, गंगाधर जाधव सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य होईस्तोवर उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)