वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
By Admin | Updated: May 7, 2015 00:59 IST2015-05-07T00:59:03+5:302015-05-07T00:59:03+5:30
चिमूर तालुक्यातील भिसी परिसरात जंगललगत असलेल्या शेतीला वन्यप्राण्यांपासून अतोनात नुकसान होत आहे.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
चिमूर : चिमूर तालुक्यातील भिसी परिसरात जंगललगत असलेल्या शेतीला वन्यप्राण्यांपासून अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे पेरणीच्या हंगामापासून हजारो रुपयांची लागत शेतात लावून शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळत नाही. त्यामुळे भिसी परिसरातील वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्याची मागणी जिल्हा परिषद चंद्रपूरचे गटनेते डॉ. सतिश वारजूकर यांनी केली.
काँग्रेस कमेटी भिसीच्या वतीने आयोजित चिमूर तहसील कार्यालयासमोरील धरणे आंदोलन कार्यक्रमात सतिश वारजूकर बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम डुकरे, काँग्रेस कमेटी भिसी अध्यक्ष अरविंद रेवतकर, वननियंत्रण समिती अध्यक्ष मनोज गेडाम, सचिव किसन कुमले, उपाध्यक्ष देवानंद भीमटे, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष सुरेखा अथरगडे, जिल्हा उपाध्यक्षा लता अगडे, नागभीड काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शिरीष वानखेडे, धनराज मालके, सरपंच रहेमान पठाण आदी उपस्थित होते.
यावेळी सतिश वारजूकर पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित सत्ता मिळविणाऱ्या भाजप सरकारला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा दिसत नाही. धनदांडग्या व्यापाऱ्याच्या हिताचे धोरण राबवित शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
नुकसान भरपाई अर्धवटच देत शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीनला योग्य भाव न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. स्थानिक आमदार मात्र ‘आमदार आपल्या दारी’ या कार्यक्रमातून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी गावोगावी फिरत असल्याचा देखावा करीत आहे. भिसी परिसरातील शेतकरी आपल्या समस्या सोडविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतात. मात्र या समस्येकडे स्थानिक आमदार लक्ष देत नसून प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या पंधरा दिवसात भिसी परिसरातील समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वारजूकर यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संगिता राठोड व प्रभारी तहसीलदार बोल्हेकर हे गैरहजर असल्याने नायब तहसीलदार येनगेंदलवार यांना निवेदन देण्यात आले. संचालन राजेंद्र मोहीतकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)