चोरटी येथील नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा
By Admin | Updated: July 10, 2017 00:24 IST2017-07-10T00:24:30+5:302017-07-10T00:24:30+5:30
मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत.

चोरटी येथील नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा
किसान क्रांती मोर्चा : आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी: मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्या नरभक्षी वाघाला जेरबंद करा अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा किसान क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा हळदा, बोळधा, मुडझा, बल्लारपूर, कुडेसावली, पद्यामपूर, भूज, आवळगाव, कोसंबी, मुरपार, गायडोंगरे वायगाव व चोरटी परिसरात नरभक्षक वाघामुळे मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७ जुलै ला ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी या गावात दुपारी सहदेव पांडूरंग तलमले (५०) व नारायण शिवराम कांबळी (३५) यांचेवर वाघाने हल्ला करुन गंभीर जखमी केले. तसेच मागील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत अनेकांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. तर अनेक जनावरांना आपले भक्ष्य बनवीले आहे.
त्यामुळे नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी व वाघाच्या हल्ल्यातील मृत पावलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी परिसरातील हजारो लोकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होते, तसेच वनविभाग कार्यालयावर ठिय्या आंदोलन, मोर्चे, धरणे करुन वारंवार निवेदन दिलेले आहे. मात्र अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळे नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या चोरटी येथील ग्रामस्थांना आर्थिक मदत देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशार किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर, उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांना तहसीलदार विद्यासागर चव्हान यांच्या मार्फत देण्यात आले.
या शिष्टमंडळात विनोद झोडगे, महेश पिलारे, मोंटू पिलारे, अतुल राऊत, नामदेव नखाते, अविनाश राऊत, सुधीर सेलोकर, मोरेश्वर उईके, शुभम पत्रे, नरेंद्र नरड उपस्थित होते.