पती-पत्नीला एकाच चितेवर अग्नी देऊन अंत्यसंस्कार
By Admin | Updated: June 1, 2015 01:31 IST2015-06-01T01:31:45+5:302015-06-01T01:31:45+5:30
घरून बेपत्ता झालेल्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी घरी धडकताच पत्नीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली.

पती-पत्नीला एकाच चितेवर अग्नी देऊन अंत्यसंस्कार
लग्नाच्या वाढदिवशी अंत्यसंस्कार : घातपात असल्याची वडिलाची तक्रार
वरोरा : घरून बेपत्ता झालेल्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी घरी धडकताच पत्नीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. मृत पती-पत्नीला रविवारी एकाच चितेवर ठेवून अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
वरोरा शहरानजीकच्या चिनोरा गावातील बांधकाम साहित्य व्यावसायिक रवींद्र बळीराम डोंगरकर आठ दिवसांपूर्वी घरून निघून गेले. २६ मे रोजी त्याचा पडोली रेल्वे मार्गानजीक मृत्यू झाला. अनोळखी मृतदेह असल्याने पडोली पोलिसांनी दफन केले. ३० मे रोजी रवींद्रच्या घरच्यांनी त्याच्या कपड्यावरुन मृतदेह रवींद्रचा असल्याचे ओळखले. मृतदेह घरी नेण्याचे सोपस्कार पूर्ण करीत असल्याची वार्ता घरी त्याची पत्नी रोशनी हिच्या कानाी पडताच रोशनीने स्वत:वर रॉकेल टाकून जाळून घेतले. त्यात ती जागीच मृत पावली. पती-पत्नीवर चिनोरा येथील स्मशानभूमीत एकाच चितेवर मृत रवींद्र याला भाऊ अशोक याने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी मोठा आप्त परिवार शोकाकूल अवस्थेत उपस्थित होता. (तालुका प्रतिनिधी)
लग्नाचा तिसरा वाढदिवस
दोन वर्षापूर्वी रवींद्र व रोशनीचा ३० मे रोजी विवाह झाला होता. रवींद्रचा मृत्यू २६ मे रोजी तर रोशनीचा ३० मे रोजी झाला. दोघांवरही लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग डोंगरकर कुटुंबीयांवर आला.
मुलाचा घातपाताने मृत्यू, पित्याची पोलिसांत तक्रार
घातपात घडवून माझ्या मुलाला ठार मारल्याची तक्रार मृत रवींद्रचे पिता बळीराम डोंगरकर यांनी पोलिसात केली आहे. या तक्रारीत संशय व्यक्त केलेल्या व्यक्तीचे नाव मात्र कळू शकले नाही.
पोलिसांना शवविच्छेदन अंतिम अहवालाची प्रतीक्षा
मृताच्या पित्याची पोलिसांना तक्रार प्राप्त झाली आहे. पोलिसांनी काही व्यक्तींचे बयाने नोंदविले असल्याचे समजते. आता मृत रवींद्र्रच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यावर या प्रकरणातील तपासणी दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.