ब्रह्मपुरी पालिकेचा मनमानी कारभार
By Admin | Updated: March 12, 2017 01:33 IST2017-03-12T01:33:42+5:302017-03-12T01:33:42+5:30
वाही नाला अतिक्रमण, कोट तलाव सौंदर्यीकरण, नागरिकांवर शास्ती दंड लादणे, नागरिकांना प्रमाणपत्रासाठी ताटकळत ठेवणे

ब्रह्मपुरी पालिकेचा मनमानी कारभार
पत्रपरिषदेत माहिती : न.प. उपाध्यक्षांचा आरोप
ब्रह्मपुरी : वाही नाला अतिक्रमण, कोट तलाव सौंदर्यीकरण, नागरिकांवर शास्ती दंड लादणे, नागरिकांना प्रमाणपत्रासाठी ताटकळत ठेवणे आदी प्रकार सुरू असून प्रशासनाने मनमानी कारभार चालविला आहे. तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या पत्रपरिषदेत न.प. उपाध्यक्षा रश्मी पेशने यांनी दिला आहे.
देलनवाडी स्थित वाही नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करून नाला पक्का बांधण्याविषयी टेंडर काढण्याबाबत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर प्रक्रिया करण्यात आली. नाल्याचे रुंदीकरण सिटी सर्वे नुसार ३० मीटर होणे जरूरीचे आहे. पण केवळ थातूरमातूर १० मीटर नाल्याचे रुंदीकरण करून प्रशासन अतिक्रमणधारकांना संरक्षण देत आहे. आधी सिटी सर्वेचा रिपोर्ट बोलावून नाला रुंदीकरण व खोलीकरण करावे अन्यथा काम बंदू पाडू, असा इशारा देण्यात आला. दुसरीकडे कोट तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शासनाच्या निधीचा अपव्यय करणे सुरू आहे. आधी सौंदर्यीकरणाचे पूर्ण काम करूनच विद्युत खांब लावावे. परंतु काम ९० टक्के अपूर्ण असून पहिलेच उजेड पाडण्याचा अफलातून प्रकार प्रशासनाने सुरू केला आहे. कोट तलावाची केस न्याय प्रविष्ठ असून त्यावर कारवाई चालू असताना हे सर्व का करण्यात येत आहे. याबद्दल शंका निर्माण होत आहे.
मालमत्ता कर व इतर करावर शास्ती दंड लावून गरिबांची लूट करणे प्रशासनाने सुरू केले आहे. ‘क’ वर्गाच्या नगरपालिकेत या प्रकारची अंमलबजावणी करणे चुकीचे आहे. शास्ती दंड मागे घेण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना विविध प्रमाणपत्रासाठी आठ ते दहा दिवस चकरा माराव्या लागतात. महत्त्वाचे काम असल्यास नागरिकांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही. प्रशासनाने नागरिकांशी खेळू नये, नागरिकांच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
नगरपालिकेमध्ये बांधकाम विषयीचे ई टेंडरिंगचे काम तांत्रिक त्रुटीमुळे रद्द झाले असतानासुद्धा नगरपरिषदेच्या सभेमध्ये मंजुरीसाठी वारंवार सादर केले जाते. यामागे बोलविता धनी कोण आहे, याचा विचार करण्यात यावा. प्रशासनाने याबाबत वेळीच दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, अशा इशारा न.प. उपाध्यक्ष रश्मी पेशने यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
नगरसेवक झाले ठेकेदार
नगरपालिकेतील बहुतांश नगरसेवकच ठेकेदार झाल्याने निकृष्ठ दर्जाचे कामे केली जात आहेत. केवळ पैसा लाटणे हा एकमेव गोरखधंदा सध्या सुरू असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त होत आहे.
नगर परिषदेच्या पत्राला केराची टोपली
नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण धारक व अन्य तक्रारीच्या आधारावर काहींना नगर परिषदेचे नोटीस बजावले आहेत. परंतु अशा नोटीसधारकांनी केराची टोपली दाखविल्याने प्रशासन नेमके कुणासमोर झुकते आहे, हा प्रश्न निर्माण होत आहे.