शिष्यवृत्ती घोटळ्याच्या चौकशी पथकातील सदस्यांकडून मनमानी
By Admin | Updated: April 14, 2016 01:13 IST2016-04-14T01:13:56+5:302016-04-14T01:13:56+5:30
सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपात संपुर्ण राज्यात गैरव्यवहार झाला.

शिष्यवृत्ती घोटळ्याच्या चौकशी पथकातील सदस्यांकडून मनमानी
अनेकांना मानसिक त्रास : बाळू धानोरकर यांचा विधानसभेत औचित्याचा मुद्दा
वरोरा : सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपात संपुर्ण राज्यात गैरव्यवहार झाला. या प्रकाराची चौकशी शासनाने सुरू केली. त्याकरिता पोलीस अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले. परंतु, सदर पथक फक्त विदर्भातील आठ जिल्ह्यात चौकशी करून संस्था चालक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना बोलावून अधिकाराचा गैरवापर करीत आहे. चौकशी पथक वेळप्रसंगी पैसे उखळत आहे. याकरिता सामाजिक न्याय विभागाने तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी विधानसभागृहात आ. बाळू धानोरकर यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित करून केली.
सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती प्रकारामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी राज्यभर सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात चौकशी करण्याकरीता नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाने केंद्र शासनाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वाटपात राज्यात गैरव्यवहार झाले किंवा नाही याबाबत चौकशी करताना आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करीत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, त्यांचे कर्मचारी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक लेखा व वित्त विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे नव्याने चौकशी पथके नेमण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीमध्ये संपूर्ण राज्यात गैरव्यवहार झाला असताना चौकशीकरिता नेमण्यात आलेले पथक विदर्भातील आठ जिल्ह्यामध्ये चौकशी करीत आहे. यामुळे संस्था चालक, प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर दडपण आणण्यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर भरणा करण्यात आल्याचा आरोप आ. बाळू धानोरकर यांनी विधानसभागृहात करित शिष्यवृत्ती संदर्भात ज्ञान नसताना पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आला. चौकशी पथकातील सदस्यांना ज्ञान नसताना कशी चौकशी करू शकते, याबाबत संशयाचे वातावरण तयार झाले आहे. चौकशी पथकातील सदस्य हे विद्यार्थी, कर्मचारी व संस्था चालकांवर गुन्हा दाखल नसताना वारंवार चौकशीकरिता बोलावित असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होवून मनस्थितीवर विपरीत परिणाम होत आहे. यातून आत्महत्येसारख्या अनुचीत घटना घडण्याची शक्यता आहे. पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याकडून चौकशी करते वेळी अधिकाराचा गैरवापर करून पैसे उकळण्याकरीता विद्यार्थी, कर्मचारी व संस्था चालका यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी तातडीने लक्ष घालून सुरक्षात्मक कार्यवाही करावी, असे आ. धानोरकर म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)