वेकोलि वणी क्षेत्राच्या व्यवस्थापनाची मनमानी
By Admin | Updated: June 5, 2015 01:15 IST2015-06-05T01:15:08+5:302015-06-05T01:15:08+5:30
वेकोलिच्या कोलगाव खुल्या कोळसा खाणीच्या कामगारांना अचानक इतरत्र खाणीत हलविल्याने कामगारांनी काल बुधवारी सकाळी ६ वाजतापासून ...

वेकोलि वणी क्षेत्राच्या व्यवस्थापनाची मनमानी
कामगार संघटनांची सहभाग : खाण कामगारांचे पाच तास धरणे
घुग्घुस : वेकोलिच्या कोलगाव खुल्या कोळसा खाणीच्या कामगारांना अचानक इतरत्र खाणीत हलविल्याने कामगारांनी काल बुधवारी सकाळी ६ वाजतापासून कोलगाव कोळसा खाणीच्या मुख्य गेटवर धरणा दिला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे व्यवस्थापन हादरले. दरम्यान, इंटक युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सादलावार यांनी मुख्य महाव्यवस्थापक राजीव दास, उपमहाप्रबंधक अजय सिंग यांच्याशी वार्तालाप करून जैसे थे ची स्थिती ठेवण्याची व जेसीसी कमेटीशी चर्चा करून बदलीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. पाच तास चाललेल्या आंदोलनात पाचही ट्रेड युनियनचे पदाधिकारी कामगारांचा सहभाग होता.
वेकोलि वणी क्षेत्राअंतर्गत कोलगाव खुली कोळसा खाण आहे त्या खाणीचे उत्पादनाचे कार्य कंत्राट पद्धतीने सुरू असतानाच मागील वर्षी ठेकेदारांनी काम बंद करून पळ काढला. त्यामुळे कोळसा उत्पादन थांबले. या खाणीचे साडेतीन लाख उत्पादनाचे लक्ष होते. काम थांबल्यामुळे वेकोलिने नायगाव, निलजई कोळसा खाणीतील डम्पर ड्रीलमशीन, लोडिंग मशीन संयत्र आणि कामगारांना जेसीसी कमेटीला विश्वासात घेऊन कोलगाव कोळसा खाणीत पाठवून कोळसा उत्पादन केले. त्यात त्या कामगारांनी पाच लक्ष टन कोळसा उत्पादन करून यशाचे शिखर गाठले. वेकोलिने सदर खाणीतील कामगारांना जेसीसी कमेटीला विश्वासात न घेता त्या कामगारांना इतरत्र खाणीत हलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष फोफावला होता. (वार्ताहर)