१.२८ कोटींचा अखर्चीत निधी खर्च करण्यास मंजुरी
By Admin | Updated: January 3, 2017 00:39 IST2017-01-03T00:39:04+5:302017-01-03T00:39:04+5:30
राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेष कृती ....

१.२८ कोटींचा अखर्चीत निधी खर्च करण्यास मंजुरी
नक्षलग्रस्त भाग : वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
चंद्रपूर : राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत २०१४-१५ मधील अखर्चीत निधी २०१६-१७ मध्ये खर्च करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे. त्या संदर्भात २ जानेवारीच्या परिपत्रकान्वये नियोजन विभागाने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
विशेष कृती कार्यक्रमांतर्गत अखर्चीत निधी रुपए १ कोटी २८ लक्ष ७१ हजार रुपये २०१६्१७ मध्ये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली असून यात प्रस्तावित कामे अन्य कोणत्याही योजनेतून घेण्यात आलेली नाही. नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा, जिवती, राजुरा, सावली, गोंडपिपरी, मूल, कोरपना या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, स्वच्छतागृहांचे बांधकाम या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे. या कामांसाठी मार्च-२०१५ मध्ये निधी प्राप्त झाला होता. निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेशसुध्दा देण्यात आले होते व कामाला सुरूवात करण्यात आली होती. आॅक्टोबर-२०१५पासून सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत कनिष्ठ अभियंत्यांना पुनर्नियुक्ती आदेश न मिळाल्यामुळे देयके तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे मार्च-२०१६मध्ये हा निधी खर्च करता आला नाही. त्यामुळे प्रगतीपथावर असलेली कामे पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही अडचण लक्षात घेता हा अखर्चीत निधी खर्च करण्यास मंजुरी मिळण्यासाठी वित्त व नियोजन मंत्री मुनगंटीवार यांच्या निदेर्शान्वये परिपत्रक निर्गमित करून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये संरक्षक भिंत, स्वच्छतागृहे या सुविधा पुरविण्याचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे. (प्रतिनिधी)