मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी
By Admin | Updated: March 21, 2017 00:36 IST2017-03-21T00:36:29+5:302017-03-21T00:36:29+5:30
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी
विशेष बाब : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात नागरिकांना शब्द दिला होता. या निर्णयामुळे नागरिकांत आनंद पसरले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकी दरम्यान मानोरा येथे झालेल्या जाहीर सभेत विशेष बाब म्हणून महिनाभरात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना शब्द दिला होता. त्यांनी दिलेला शब्द महिनाभराच्या कालावधीत पूर्ण केला आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ मार्च रोजी या बाबतचा शासन निर्णय निर्गमित केलाआहे.
मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. सन २००५ पासून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी शासन दरबारी रेटून धरली होती. विधानसभेच्या माध्यमातूनही त्यांनी या मागणीचा पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. मानोरा सह नजिकच्या कवडजई, किन्ही, ईटोली, आसेगाव, गिलबिली, मोहाडी तुकुम, कोरटी तुकुम आदी गावांना या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
समस्या सुटणार
मानोरा हे गाव परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी कित्येक दिवसांपासून सुरू होती. ही मागणी आता मार्गी लागली आहे.