उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी

By Admin | Updated: November 6, 2016 01:00 IST2016-11-06T01:00:40+5:302016-11-06T01:00:40+5:30

चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेला वाहतूक प्रश्न यासाठी शहराला वळण मार्गाची गरज आहे.

Approval of the flyover | उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी

उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी

आमदार शामकुळे : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यांकडे मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेला वाहतूक प्रश्न यासाठी शहराला वळण मार्गाची गरज आहे. मात्र ज्या भागातून वळण मार्ग प्रस्तावित होता. त्याच ठिकाणी आता लोकवस्ती झाली आहे. त्यामुळे पर्याय शोधावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर इरई नदी ते बंगाली कॅम्प यापर्यंत साडेसहा किलोमीटरचा उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार नाना श्यामकुळे यांनी केली आहे.
शहराची वाढती लोकसंख्या तसेच औद्योगिककरण पाहता वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. १९८० मध्ये बायपाससाठी हॉटेल ट्रायस्टारच्या मागील भागातून तुकूम-शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाकडून जागा निश्चित करण्यात आली होती. या भागात आता जवळपास सातशे घरांची वस्ती आहे. इतकी मोठी वस्ती उठवून शहराच्या मध्यभागातून बायपास काढणे शक्य नसल्याने या बायपाससाठी स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध झाला. या भागातील वस्ती उठवून बायपास काढणे हे अन्यायकारक ठरणार असल्याने या बायपाससाठी मंजुरी देण्यात येऊ नये म्हणून काँग्रेसचे नगरसेवक अशोक नागपुरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने नुकतेच एक शपथपत्र दाखल केले असून त्या बायपाससाठी नवीन जागेचा शोध सुरू असल्याचे म्हटले आहे. मोरवा गावाच्या आतील भागातून लोहाऱ्यापर्यंत बायपास काढण्यात यावा, अशी सूचना होती. हे अंतर जवळपास ३५ किलोमीटरचे आहे. बायपाससाठी असलेल्या निकषामध्ये हे अंतर बसत नाही. त्यामुळे इरई नदी ते बंगाली कॅम्पपर्यंत उड्डाणपुलाची निर्मिती करणे हा एकमेव पर्याय आहे.यासंदर्भात अनेक दिवसांपासून आमदार शामकुळे यांचा पाठपुरावा सुरू आहे. शामकुळे यांनी पुन्हा नितीन गडकरी यांची भेट घेऊन उड्डाणपुलाची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

अलिकडच्या पाच वर्षात चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्यावे वाढली आहे. येत्या काही वर्षात ती आणखी प्रचंड वाढेल. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मिटविण्यासाठी इरई नदी ते बंगाली कॅम्पपर्यंत उड्डाणपुल गरजेचा आहे.

Web Title: Approval of the flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.