चिमूर नगर परिषदेला मंजुरी
By Admin | Updated: March 13, 2015 01:04 IST2015-03-13T01:04:37+5:302015-03-13T01:04:37+5:30
चिमूर क्रांतीभूमित नगर परिषद निर्मितीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर नगर ...

चिमूर नगर परिषदेला मंजुरी
चिमूर: चिमूर क्रांतीभूमित नगर परिषद निर्मितीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर नगर विकास विभागाने पत्राद्वारे चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चिमूर येथे नगर परिषद स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्याची माहिती देऊन पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या गेल्या पंधरा - वीस वर्षापासून रखडलेल्या मागणीची पूर्तता होत असल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
चिमूर येथे मागील दोन वर्षांपासून तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहिद स्मृतीदिन सोहळ्यात चिमूर व नागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षांपासून या घोषणेची कुठलीही अंमलबजावणी न होता, या दोन्ही शहरात राज्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणा प्रमाणे नगरपंचायतीची उद्घोषण काढण्यात आल्या होती. मात्र चिमूर येथे नगरपरिषदच हवी, हा गावकऱ्यांचा व स्थानिक राजकीय नेत्यांचा आग्रह होता.
मध्यंतरी राज्यात विधानसभेच्या निवडणूका घेवून सत्तांतर झाले. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर चिमूर व नागभीड नगर परिषदेच्या निर्मितीसाठी चिमूरचे आ. किर्तीकुमार भांगडिया हे गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. नगर परिषद निर्मितीसाठी लागणारी कागदपत्रे, प्रस्ताव व तसेच या नगर परिषद क्षेत्रात समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांची सहमती मिळविण्याकरिता प्रयत्न करण्यात आले. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या काळात चिमूर नगरपरिषदेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी करून मंजुरी दिली. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर नगर विकास विभागाने तात्काळ १६ मार्चला चिमूर येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावावर शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. (शहर प्रतिनिधी)