अमृतकरांच्या नियुक्तीने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

By Admin | Updated: November 13, 2014 22:59 IST2014-11-13T22:59:08+5:302014-11-13T22:59:08+5:30

चंद्रपर महानगर पालिकेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोपाने चर्चेत आलेल्या माजी महापौर संगीता अमृतकर यांची नियुक्ती जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी केल्यावरून सध्या जिल्ह्यातील काँग्रेसमधील

The appointment of Amritkar again revolves around the Congress in grouping | अमृतकरांच्या नियुक्तीने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

अमृतकरांच्या नियुक्तीने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

चिंतनाची गरज : पक्षविरोधी काम करणाऱ्यांना किमान बक्षीस देऊ नये
चंद्रपूर : चंद्रपर महानगर पालिकेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोपाने चर्चेत आलेल्या माजी महापौर संगीता अमृतकर यांची नियुक्ती जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी केल्यावरून सध्या जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वातावरण प्रचंड तापले आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षनेते असेच बक्षिस देत असतील, तर पदावर राहण्यात काय अर्थ, असा सवाल करीत काँग्रेसच्या प्रदेश सचिव सुनिता लोढीया यांनी गुरूवारी राजिनाम्याचा इशारा दिला. यामुळे पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड अपयश येऊनही काँग्रेस नेतेमंडळी आपली मानसिकता अद्यापही बदलायला तयार नाहीत. ही मंडळी गटातटाच्या बाहेर यायला तयार नाहीत. परिणामत: जिल्ह्यात काँगे्रसमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी आता रोजच्याच भांडणासारखा विषय होऊ पहात आहे.
गेल्या पंधरवाड्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्येच दोन गट पडले होते. ही भानगड निस्तारण्यासाठी पक्षाने निवडणूक निरीक्षक पाठवूनही परिस्थिती सुधारली नाही. काँग्रेसच्या नगरसेविका राखी कंचर्लावार ऐनवेळी भाजपात गेल्या आणि काँग्रेस नगरसेवकांच्या अन्य गटाच्या पाठिंब्याने महापौर म्हणून विजयीही झाल्या. या घडामोडीत माजी महापौर संगीता अमृतकर आणि स्थायी समिती सभापती रामू तिवारी आघाडीवर असल्याच्या तक्रारीही पक्षाकडे झाल्या होत्या. काँग्रेसला मनपात सत्ता स्थापनेची संधी होती, केवळ ती गटबाजीतून दवडली म्हणून या गटावर कारवाई होण्याची अपेक्षा काँग्रेसमधील दुसऱ्या गटाला होती. मात्र कारवाईऐवजी संगीता अमृतकर यांची जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे पक्षातील अंतर्गत वातावरण चिघळले आहे. हा प्रकार जखमेवर मीठ चोळणारा असल्याने अमृतकर यांची नियुक्ती सहन कशी करायची, असा प्रश्न आता दुसऱ्या गटातील नगरसेवक आणि पक्षातील पदाधिकारी विचारत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The appointment of Amritkar again revolves around the Congress in grouping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.