जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू
By Admin | Updated: January 12, 2017 00:32 IST2017-01-12T00:32:08+5:302017-01-12T00:32:08+5:30
राज्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील जिल्हा परिषद व महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी जाहीर केला.

जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू
पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने सरकारजमा
चंद्रपूर : राज्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील जिल्हा परिषद व महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच निवडणूक असणाऱ्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हा परिषद पदाधिकारी व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने सरकार जमा करण्यात आली आहेत.
निवडणूक आयुक्तांनी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तेव्हाच जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यातील शासकीय वाहने प्रशासनाच्या ताब्यात दिली. यात जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले, जि. प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर, बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे, समाजकल्याण सभापती निलकंठ कोरांगे, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे यांचा समावेश आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली शासकीय वाहने सरकारजमा केली आहेत. तर पंचायत समिती सभापतींनाही शासकीय वाहन दिले जाते. आदर्श आचारसंहिता लागू होताच पंचायत समिती सभापतींचेही वाहने सरकार जमा करण्यात आली असून निवडणुकीनंतर नव्याने निवड होणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ही वाहने दिली जाणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
महापौरांचे वाहन कायम
चंद्रपूर शहर हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात असून जिल्हा परिषदेच्या प्रभावक्षेत्राबाहेर आहे. त्यामुळे चंद्रपूर मनपा क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू नसल्याने चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौरांचे शासकीय वाहन कायम ठेवण्यात आले आहे.